मौदा (जि. नागपूर) : तुळतुळा या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चितेंत सापडला आहे. अगोदर अवकाळी पावसामुळे धानाचे पीक जमीनदोस्त झाले. त्यात शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धान पीक खाली पडले की तो पानफोल होत असते. त्यात तांदूळ भरत नाही. त्यामुळे धान पीक हे अर्ध्यावर आलेले दिसून येतो. शेतकरी या संकटातून सावरत नाही तर मावा, तुडतुडा कीडांच्या प्रहाराने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे.
धान पिकांवर फवारणीचा खर्च तिपटीने वाढला आहे. उत्पनापेक्षा जास्त खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अगोदरपासूनच शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर आहे. धान लावणीपासून शेतकरी कर्ज काढत असतो आणि धनाचे पीक आल्यानंतर परत करीत असतो. परंतु, अतिवृष्टी व रोगाने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. म्हणून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या धानाच्या पिकांची त्वरित पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाना ठाकरे यांनी तहसीलदार प्रशात सांगळे यांना केली आहे.
ऐन धान पकण्याचा अगदी वेळेवर तुळतुळा रोगाने अतिक्रमण केल्याने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. त्याच्या वर्षभराचा पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. तेव्हा मायबाप सरकारने या गंभीर बाबींचा विचार करून तात्काळ पंचनामे करून एकरी पंन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमरेड विधान सभा प्रभारी राजेंद्र मेश्राम, वंचितचे नागपूर महासचीव अमरदिप तिरपुडे आदींनी केली आहे.
तुडतुडा रोगाला पोषक हवामान
तालुक्यात सप्टेंबर महिन्यात तुडतुडा रोगाने जोर पकडला. शेतकऱ्यांनी ५ वेळा फवारणी करूनही हा रोग गेला नाही. हा महिना संपूर्ण उष्ण हवामानात गेला. याच महिन्यात धान पोटरीत होता. या महिन्यात अर्धा तासही पाऊस आला असता तर हा रोग वाहून गेला असता. परंतु, असे झाले नाही आणि या रोगाला पोषक वातावरण मिळाल्यामुळे धानावर रोगाने प्रहार केला.
- सतीश कोरे,
कृषी सहायक, मोरगाव
पंचनामे झाले नाही
ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे ५०८० हेक्टरमधील पडलेल्या धानाचे पंचनामे झाले. तुडतुडा रोगाबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांमार्फत व ग्रामपंचायतच्या फलकावर सूचना देण्यात आल्या. परंतु, उष्णतेमुळे तुडतुडा रोग आवाक्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तुडतुडा या रोगाचे पंचनामे केल्याचा शासनाकडून आदेश आलेला नाही. आदेश आला की पंचनामे करण्यात येतील.
- संदीप नाकाडे,
कृषी अधिकारी तालुका, मौदा
नुकसान भरपाई द्यावी
शेतकरी हा दरवर्षीच कोणत्या ना कोणत्या संकटासी सामना करतो. यावर्षी तर ज्या धान पिकावर खाण्याची व्यवस्था होते ते पिकच हातून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तेव्हा शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- अमरदीप तिरपुडे,
नागपूर महासचिव, वंचित बहुजन आघाडी
पाण्याशिवाय काहीच उरलेले नाही
एका एकराला पंधरा हजारांच्या जवळपास खर्च येतो. यावर्षी एकराला पाचही हजाराचे धान होणार की नाही हा प्रश्न आहे. आता तोंडाशी आलेला घास तुळतुळा या रोगाने हिसकावल्यामुळे शेतकऱ्यांनाच्या डोळ्यात पाण्याशिवाय काहीच उरलेले नाही.
- गुणाकार सेलोकर,
शेतकरी तथा मांढळ बाजार समितीचे संचालक
संपादन - नीलेश डाखोरे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.