कळमेश्वर (जि. नागपूर) ः अलीकडे लग्नाचे आमीष देऊन मुलींना फसविण्याचे, त्यांचे शोषण करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. मुलीसुद्धा अशा लबाडांच्या भूलथापांना सहज बळी पडतात आणि आपले सर्वस्व गमावून बसतात. जेव्हा त्यांचे डोळे उघडते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग जीवनात त्यांच्यापुढे असतो नुसता अंधार. अशीच एक अल्पवयीन मुलगी एका भामट्याच्या आमिषाला बळी पडून सर्वस्व गमावून बसल्याची घटना घडली.
एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, तुझ्याशी लग्न करतो म्हणत तिच्याशी वारंवार संबंध प्रस्थापित केले़. ही १५ वर्षीय पीडिता गर्भवती राहल्याने गोळ्या देऊन तिचा गर्भपातही केला. त्यानंतर पीडितेला लग्नास नकार दिला़. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी २१ वर्षीय आरोपी निलेश देवीदास मोरघडे (रा. वार्ड क्रमांक १५, करणे लेआऊट कळमेश्वर) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय पीडित मुलगी व आरोपी निलेश यांची डिसेंबर २०१९ पासून ओळख झाली व दोघांचेही प्रेमसंबंध जुळले़. आधी फोन व त्यानंतर प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्या़. निलेशने मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमीष दिले व तिच्याशी वारंवार संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, मुलगी आठ महिन्यांची गर्भवती राहिली़. त्यानंतर आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करवून आणला. त्यानंतर पीडितेची इच्छा नसतानासुध्दा आरोपीने पुन्हा तिच्यासोबत वारंवार बळजबरी केली. मात्र, मुलीने लग्न करण्याबाबत विचारले असता तिला शिवीगाळ करून मारहाणीची धमकी देत पुन्हा अत्याचार केला.
निलेशने तिच्यासोबत अत्याचार करताना मोबाईलने व्हिडीओ काढले होते. ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतो, अशी धमकी तो द्यायचा व पीडितेवर वांरवार बळजबरी करायचा. पीडितेला मारहाणीची धमकी व शिवीगाळ केल्यानंतर त्याने तिला लग्नासही नकार दिला. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर पीडितेने पोलिस ठाणे गाठून पोलिसांना आपबिती सांगितली. पीडितेच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सरंबळकर करीत आहेत.
संपादन ः राजेंद्र मारोटकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.