Motivation News : युवा धावपटूच्या पंखाला मिळाले सेनादलाचे बळ

हिंगणा येथील शादाब पठाणची सेनादलात हवालदार म्हणून निवड.
Shadab Pathan
Shadab Pathansakal
Updated on

नागपूर - एखादा गरीब घरातला खेळाडू असेल तर त्याला सर्वात मोठी चिंता असते ती भविष्याची. अशावेळी सरकारी नोकरीच्या रुपात त्याला कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन मिळाल्यास तो अधिक जिद्दीने मैदानात उतरून चांगली कामगिरी करण्यास प्रेरित होतो. असेच काहीसे युवा धावपटू शादाब पठाणच्या बाबतीत घडले आहे.

हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या शादाबला त्याच्या गुणवत्तेच्या जोरावर नुकतीच सेनादलात नोकरी लागली असून, आर्थिक बळ मिळाल्यामुळे आता त्याने स्वप्नपूर्तीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल सुरू केली आहे.

गरिबी व सोयी-सुविधांवर मात करत नाव कामावणाऱ्या शादाबची कहाणी खरं तर चढउतार व संघर्षाने भरलेली आहे. जन्मगाव असलेल्या सुमठाणा येथे शिक्षणाच्या फारशा सोयी-सुविधा नसल्यामुळे शादाबच्या वडिलांनी त्याला हिंगण्यात आणले. हिंगणा परिसरातील महाजनवाडी येथे राहणाऱ्या शादाबचे वडील (अय्युब पठाण) एकेकाळी पंचर बनविण्याचे काम करायचे.

मात्र त्यात फारशी कमाई होत नसल्याने त्यांनी दुकाने व विवाह समारंभांमध्ये बिसलेरीचे कॅन पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला. गरिबी व वडिलांचा संघर्ष जवळून पाहिल्याने कधी-कधी तोदेखील त्यांना मदत करायचा.

परिस्थिती बदलावायची असेल तर आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने त्याने आपल्या आवडीचे क्रीडाक्षेत्र निवडले. नेहरू विद्यालयात शिक्षण घेत असताना तो पहिल्यांदा शर्यतीत धावला. त्यावेळी त्याला पुरस्कार मिळाला नाही, मात्र स्पोर्ट्समध्ये उज्ज्वल भविष्य अवश्य दिसले.

खेळात उत्तुंग झेप घ्यायची असेल तर अनुभवी गुरू आणि योग्य प्रशिक्षण अतिशय आवश्यक आहे, हे त्याला कळून चुकले. त्यामुळे शादाबने ॲथलेटिक्स प्रशिक्षक राजेश भुते यांचा एचटीकेबीएस क्लब जॉईन केला. भुते यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक धडे गिरवत असतानाच तो शालेय स्पर्धा गाजवू लागला.

जिल्हा, विभागीय व राज्य स्पर्धांमध्ये चमकदार प्रदर्शन करत त्याने थेट राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. २३ वर्षीय शादाबचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न तेव्हाच पूर्ण होऊ शकते, जेव्हा गुरू त्या तोडीचा असेल. ही गोष्ट हेरून त्याने सहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रवींद्र टोंग यांच्याकडे मोर्चा वळविला.

टोंग यांच्या मार्गदर्शनात त्याचा खेळ आणखीनच बहरला. ते शादाबला केवळ प्रशिक्षणच देत नव्हते, तर अडचणीच्या वेळी आर्थिक मदतदेखील करीत असत. हिंगणा ते रेशीमबाग मैदान अशी सायकलने न चुकता तो रोज ६० ते ७० किमी पायपीट करायचा. ऊन, पाऊस, थंडी कशाचीही त्याने पर्वा केली नाही. या मेहनतीचे त्याला फळही मिळाले.

ॲथलेटिक्समध्ये केलेल्या शानदार कामगिरीमुळे शादाबची स्पोर्ट्स कोट्यातून आर्मीमध्ये थेट हवालदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या तो श्रीनगर येथे ट्रेनिंग पिरेडवर असून, लवकरच रुजू होणार आहे. शादाबची आशियाई व ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असून, त्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे.

नोकरीचे टेंशन कमी झाल्यामुळे मी आता निश्चिंत होऊन मैदानात उतरणार आहे. भविष्यात मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. विशेषतः ऑलिम्पिक आणि आशियाई स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे. हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे मेहनत केल्यास नक्कीच मी आपले स्वप्न साकार करू शकतो.

- शादाब पठाण, ॲथलिट

शादाबची आतापर्यंतची कमाई

  • चेन्नई येथील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत विक्रमासह रौप्यपदक

  • चंडीगडमधील नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दुहेरी सुवर्ण

  • पुणे येथील राज्य वरिष्ठ गट ॲथलेटिक्स स्पर्धेत दोन सुवर्णपदके

  • दोनवेळा राज्य ज्युनिअर स्पर्धेत ब्रॉंझ पदकांची कमाई

  • भुवनेश्वरमधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक

  • याशिवाय विविध मॅरेथॉन, क्रॉसकंट्री व दौड स्पर्धांमध्ये पदके

  • वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सच्या संभाव्य संघात निवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.