नागपूर : न्याय, समता, बंधुता ही संविधानाने बहाल केलेली मूल्ये आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात खरेच अंगीकारली काय? संविधानाच्या मूल्यांची प्रत्यक्ष अमंलबजावणी आपल्या आयुष्यात करायची तरी कशी? आदी विषयांवर समज निर्माण करण्यासाठी देशभरातील १५ राज्यांतील युवा कार्यकर्त्यांची चार दिवसांची कार्यशाळा नागपूर येथे सुरू झाली आहे.
दिल्ली येथील श्रुती संघटना आणि नागपूर येथील कष्टककरी जनआंदोलन या संघटनांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. दिल्लीसह, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आदी राज्यातून तब्बल १३० कार्यकर्ते गुरुवारी रात्रीच दाखल झाले. तसेच सर्वहारा संघटनेच्या नेत्या उल्का महाजन, कष्टकरी जनआंदोलन संघटनेचे विलासभाऊ भोंगाडे, श्रुती संघटनेचे सौरभ सिन्हा यांच्यासह ओरिसातून अमूल्या नायक, त्रिलोचन पुंजी, मध्य प्रदेशातून आराधना भार्गव, उत्तर प्रदेशातून अफाक उल्ला, दिल्लीतून सदरे आलाम, धर्मेंद्र यादव, उत्तराखंड येथून गोपाल लोधियाल, बसंती रावत, जम्मू-काश्मीरमधून डाॅ. शेख गुलाम आदी महत्त्वाचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले आहेत.
संविधानाप्रती युवकांमध्ये जागृती व्हावी, अशा रीतीने परिसरात पोस्टर्स, बॅनर्स, चित्रकृती आदी प्रदर्शित केले आहेत. सभामंडपाचे संविधान भवन नामकरण केले असून स्टेजवर मोठ्या अक्षरात आम्ही भारताचे लोक ही संविधान प्रास्ताविकेतील आद्याक्षरे लावण्यात आली आहेत. ठिकठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे विविध भारतीय भाषांमधील बॅनर्स लावले आहेत. संविधानातील न्याय, समता, बंधूता या मूल्यांसह लोकशाही गणराज्य, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आदी मूल्ये अधिक सुस्पष्ट व्हावीत, अशा नोंदीची चित्रफलके सभामंडपात लावण्यात आली आहेत.
विविध राज्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रेरणादायी गाण्यांमधून कार्यशाळेत रंग भरला. अब क्यो जनता फर्यादी है, कब जाएगा दौर पुराना, कब आएगा नया जमाना आदी रोमांचकारी गाणी सादर केली. जल, जंगल, जमीन, शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचार, दारिद्र्य गरीबांचे शोषण, विविध सरकारी योजनांची अमंलबजावणी, माहिती अधिकाराचा वापर आदी विषांवर काम करणारे युवा यात सहभागी झाल्याची माहिती सौरभ सिन्हा यांनी दिली.
कार्यकर्ते संविधानातील मूल्यांनुसार करतात की त्यांना वाटते त्या पद्धतीने? संविधानातील अधिकार आणि कर्तव्ये काय हे विविध प्रयोगात्मक पद्धतीने या कार्यशाळेतील युवांना शिकविण्यात येतील.
-विलासभाऊ भोंगाडे, सामाजिक कार्यकर्ते
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.