यवतमाळ : तरुणीच्या सतर्कतेने नरबळीचा प्रयत्न फसला

मादणी येथील घटना; नराधम बाप अन्‌ मांत्रिकासह नऊ जणांना अटक
नरबळी
नरबळीSakal
Updated on

बाभूळगाव (जि. यवतमाळ) - गुप्तधनासाठी पोटच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या बापाचे पितळ पोलिस ऐनवेळेवर घटनास्थळी पोहचल्याने उघडे पडले. पीडित मुलीने सतर्कतेने मित्राकरवी ही माहिती पोलिसांना पोहचवल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही घटना तालुक्यातील मादणी येथे सोमवारी (ता. २५) रात्री झाली. या घटनेत सहभागी मांत्रिकांसह नऊ जणांवर बाभूळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मादणी येथील रहिवासी व सध्या औरंगाबाद येथे बी. फार्मच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या मुलीने याबाबत बाभूळगाव पोलिसांत सोमवारी (ता. २५) तक्रार नोंदविली आहे. तक्रारीत तिने वडिलाचे सर्व कारनामे नमूद केले असून नराधम बापाने केवळ बळीच देण्याचा प्रयत्न केला नसून तिच्यावर अत्याचार केल्याचेही म्हटले आहे.

प्रकृती बरी नसल्याने पीडिता औरंगाबादवरून मादणी येथे वडिलांकडे आली होती. या संधीचा फायदा घेत बापाने गुप्तधनासाठी पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचा डाव रचला. त्याने आठ साथीदारांना बोलावून गुप्तधन काढण्यासाठी पूजाविधी सुरू केला. दोन्ही मुलींच्या हाता लिंबू देऊन जागेची पूजा केली. मांत्रिकाने मंत्रोपचार सुरू करून काही जणांनी खोल खड्डा खोदण्याला सुरुवात केली. हे सुरू असताना मांत्रिकाने पीडितेच्या वडिलांना गुप्तधनासाठी एका मुलीचा नरबळी देणे आवश्यक असल्याचे सांगितले. हे मुलीने ऐकले. त्यामुळे पीडितेला बाप नरबळी देण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय आला. तिने यवतमाळ येथील आपल्या मित्राला खोदलेल्या खड्ड्यांचा फोटो पाठविला. मित्रांकडून सदर माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिस पोहोचल्यावर गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खोदणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या घटनेत सहभागी वडिलांसह मांत्रिक व इतर नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून पूजेचे साहित्य जप्त केले.

अटक केलेल्यांमध्ये पीडितेच्या वडिलांसह मांत्रिक वाल्मिक वानखेडे, विजय बावणे, रमेश गुडेकार, विनोद चुनारकर, दीपक श्रीरामे, आकाश धनकसार, माधुरी ठाकूर, माया संगमनेरकर यांचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. २६) उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास बाभूळगाव पोलिस करीत आहे. सर्व आरोपींना आज यवतमाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पीडितेवर बालपणापासूनच अत्याचार

आई सतत आजारी राहत असल्याने नराधम बापानेच वयाच्या १३ व्या वर्षांपासून अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिस तक्रारीत म्हटले आहे. तो नेहमीच तिला व तिच्या आई-बहिणीसह जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून वडिलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.