वर्धा : महात्मा गांधी यांची काँग्रेस ही सत्य आणि देशहित जोपासणारी होती पण आजमितीस हे स्वरूप बदलले आहे. या पक्षातील लोक परदेशात जाऊन देश तोडण्याची भाषा बोलतात. आजची काँग्रेस खोटी, धोकेबाज आणि बेईमान असून हा पक्ष तुकडे ‘तुकडे गँग’ व शहरी नक्षली चालवीत आहेत,’’ असा सनसनाटी आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केला.
येथील स्वावलंबी शिक्षण संस्थेच्या मैदानावर ‘पंतप्रधान- विश्वकर्मा’ योजनेच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘अमरावती आणि वर्धेकरांना नमन’ असे म्हणत पंतप्रधानांनी मराठीतून भाषणाची सुरवात केली.
ते पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये देशभक्ती महत्त्वाची होती. आजच्या काँग्रेसमध्ये देशभक्तीचा अंशही नाही. काँग्रेस देशात धर्मांधता पसरवीत आहे त्यांच्या दृष्टीने गणपती पूजन टीकेचे साधन झाले आहे. गणपती प्रतिष्ठापना आणि पूजा त्यांच्यासाठी राजकारणाचा विषय ठरत आहे.’’
‘‘ विदर्भ कापूस उत्पादकांचा भाग आहे. असे असताना विरोधकांनी विशेषतः काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी कापूस उत्पादकांच्या विकासाकरिता काम करण्याऐवजी त्यांच्या कापसाचा वापर केवळ राजकारणाकरिता केला. यामुळे उत्पादक मागास राहिले. या कापूस उत्पादकांना सोन्याचे दिवस येण्याकरिता देशातील सातपैकी एक टेक्स्टाईल पार्क अमरावती येथे सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून रोजगार तर मिळेल पान २ वर
पण सोबतच कापूस उत्पादकांना योग्य भाव मिळेल त्यातून त्यांना विकास साधता येईल,’’ असेही मोदींनी नमूद केले. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय उद्योगमंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग राज्यमंत्री उदय सामंत आदींची उपस्थिती होती.
केवळ काँग्रेसचा उल्लेख
कार्यक्रमस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात आठ वेळा काँग्रेस आणि मित्रपक्ष असा उल्लेख केला. विशेषतः काँग्रेसवर टीका करताना त्यांनी पक्षाचा उल्लेख केला. त्यांनी काँग्रेसशिवाय अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे किंवा पदाधिकाऱ्याचे नाव घेणे टाळले.
मोदींच्या हस्ते...
आचार्य चाणक्य कौशल्य योजनेचा प्रारंभ
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना
अमरावती येथील पी. एम. मित्र पार्कचे उद्घाटन
विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष डाक तिकिटाचे लोकार्पण
एक लाख कामगारांना ओळखपत्राचे वितरण
एक लाख विश्वकर्मा लाभार्थींना कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण
लाभार्थींसाठी डिजिटल लोनचा प्रारंभ
सर्वाधिक लाभार्थी मागास वर्गातील
‘‘विश्वकर्मा योजनेत अठरा कला अवगत असलेल्या कारागिरांना जोडण्यात आले आहे. या कारागिरांना प्रशिक्षण देत एका वर्षात चौदाशे कोटी रुपयांचे कर्ज त्यांना देण्यात आले आहे. या कारागिरांना उद्योगपती, व्यावसायिक बनविण्याचे काम विश्वकर्मा योजना करणार आहे. या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील आहे मात्र आजवर काँग्रेसने त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते,’’ असेही मोदी म्हणाले.
गृहमंत्री शहा २४ सप्टेंबरला राज्यात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शहा हे २४ आणि २५ सप्टेंबरला नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूरचा दौरा करतील. स्थानिक भाजप नेत्यांशी संवाद साधत ते परिस्थितीची माहिती घेतील. शहा यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता २४ सप्टेंबर रोजी रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात विद्यमान आणि माजी लोकप्रतिनिधींची बैठक पार पडेल. यावेळी ते भाजप पदाधिकाऱ्यांशीही बोलणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.