Narendra Modi : जनतेच्या आशीर्वादाने यंदा ‘चारशे पार’ करू

‘यवतमाळच्या जनतेने मला कायम भरभरून आशीर्वाद दिले आहेत. प्रत्येक निवडणुकीआधी येथे आल्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या जागांमध्ये भर पडली आहे.
Narendra Modi
Narendra Modisakal
Updated on

यवतमाळ - ‘यवतमाळच्या जनतेने मला कायम भरभरून आशीर्वाद दिले आहेत. प्रत्येक निवडणुकीआधी येथे आल्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या जागांमध्ये भर पडली आहे. यंदाही विदर्भाच्या आशीर्वादाने आम्ही देशभरात चारशे जागांचा टप्पा पार करू. देशातील जनतेनेही हेच ठरविले आहे,’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र यांनी आज महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ फोडला. मोदी यांच्या हस्ते ३५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली, तर कळंब-वर्धा रेल्वेचे उद्‍घाटन व पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन पार पडले.

यवतमाळ शहराला लागून असलेल्या भारी येथे बुधवारी महिला बचतगट मेळावा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री संजय राठोड, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार हेमंत पाटील, खासदार भावना गवळी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व जिल्ह्यातील विधान परिषद व विधानसभेचे आमदार उपस्थित होते.

भाषणाला सुरुवात करताना मोदी म्हणाले, ‘दहा वर्षांपूर्वी यवतमाळला आलो होतो, तेव्हा येथील जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिले. तेव्हा ‘एनडीए’ला ३०० जागांवर विजय मिळाला. पुन्हा २०१९ च्या फेब्रुवारीत यवतमाळला आलो, तेव्हा ‘एनडीए’ला ३५० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला. आता पुन्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना यवतमाळपासूनच सुरुवात करीत आहे. यावेळी विदर्भातील जनता नक्कीच आशीर्वाद देईल आणि ४०० पेक्षा जास्त जागा ‘एनडीए’ जिंकेल.

गरीब, शेतकरी, तरुण व महिला सक्षम झाल्या तरच देशाचा विकास होईल. त्यासाठी केंद्र व महाराष्ट्रातील सरकार कटिबद्ध आहे.’ काँग्रेसच्या काळात दिल्लीहून दिल्या गेलेल्या शंभर रुपयांपैकी १५ रुपयेच लाभार्थींपर्यंत पोहोचत असत, असे सांगत मोदींनी, आता लाभार्थींपर्यंत पूर्ण १०० रुपये पोहोचतात आणि ही मोदींची गॅरंटी आहे, असे सांगितले. येणारी पाच वर्षे देशाच्या प्रगतीची असतील, असा आत्मविश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या या सभेला सुमारे दोन लाखांवर महिलांची गर्दी होती.

ज्या पूर्व महाराष्ट्रात सीता देवीचे मंदिर आहे, त्याच जिल्ह्यातून पंतप्रधान मोदी यांनी नारीशक्तीच्या सक्षमीकरणाची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात साडेपाच लाख महिला बचतगटांना निधी देण्यात आला असून लेक लाडकी व बसमध्ये महिलांना मोफत प्रवास आदी योजना सुरू केल्या आहेत.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देशाच्या विकासाचे स्वप्न पाहताना पंतप्रधान मोदी यांनी महिला सक्षमीकरणाला महत्त्व दिले आहे. महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी देण्याचे काम राज्यातील महायुतीचे सरकार करत आहे. लहान व्यवसायांमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

भाषणाची सुरुवात मराठीतून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर येताच दोन्ही हात जोडून अभिवादन केले. त्यांनी ’जय भवानी’ म्हणताच उपस्थित जनसमुदायाने ’जय शिवाजी’ म्हणत प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी जय सेवालाल, जय बिरसाचा जयघोष केला. पुढे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीस श्रद्धापूर्वक नमन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत असल्याचा उच्चार केला. ‘आपल्या सर्वांना नमस्कार’ असे मराठीतून अभिवादन करून पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

विविध योजनेचा महिलांना लाभ

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वर्षा सोनोने, पंचशीला शेळके व पार्वता पारधी यांना आयुष्मान योजनेच्या कार्डचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री मत्स्य समृद्ध जलाशय योजनेअंतर्गत कांचन पांडे, राधिका लाखनकर व हर्षा भोकरे यांना धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत ई-रिक्षाच्या किल्ल्या ज्योती दिलीप तायडे, आशा सोयाम व निलीमा पायघन यांना देण्यात आल्या.

या प्रकल्पांचे लोकार्पण

  • पीएम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

  • मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वितरण

  • नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसऱ्या हप्त्याचे वितरण

  • मोदी आवास योजनेअंतर्गत लाभार्थींसाठी दहा लाख घराचा शुभारंभ

  • वर्धा-नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा-कळंब व अमळनेर-आष्टी टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वेगाडीचा शुभारंभ

  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, तथा बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत विदर्भ-मराठवाड्याकरीता सिंचन योजनेचा प्रारंभ.

  • राष्ट्रीय महामार्गावरील वणी-वरोरा, साकोली-भंडारा चौपदीकरणाचे व सालईखुर्द-तिरोरा महामार्गाचे लोकार्पण

  • पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

  • आयुष्मान भारत योजनेतंर्गत एक कोटी आयुष्मान कार्डचे वाटप

छत्रपती शिवरायांपासून घेतली प्रेरणा

पंतप्रधान मोदी म्हणाले,‘‘छत्रपती शिवरायांच्या आदर्श शासनाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी सत्ता उपभोगली नाही, तर स्वराज्याच्या निर्मितीसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पित केले. महाराष्ट्राच्या या भूमीतून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन मीदेखील माझे संपूर्ण जीवन देशाच्या विकासासाठी समर्पित केले आहे. माझ्यासमोर राष्ट्रभक्ती, राष्ट्रशक्ती सर्वोच्चस्थानी असून पुढील पंचवीस वर्षांत देशाचे भविष्य घडविण्यासाठी एक मिशन म्हणून कार्य करणार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.