अमरावती : राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी १६ जागांवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने लक्ष केंद्रित केले आहे. मात्र त्या १६ जागांमध्ये विदर्भातील केवळ भंडारा-गोंदिया या मतदारसंघाचाच समावेश असल्याने राष्ट्रवादी (शरद पवार गट) अमरावतीवरील दावा सोडणार का, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४८ ही मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. अजित पवार यांच्या पक्षातील बंडानंतर बदललेले राजकीय समीकरण व सरकारबद्दल जनतेतील असंतोष या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी अनुकूल ठरणाऱ्या मतदारसंघाची पहिली संभाव्य यादी तयार करण्यात आली आहे.
यामध्ये विदर्भातील आठ लोकसभा मतदारंसघांपैकी फक्त भंडारा-गोंदिया या मतदारसंघाचा समावेश आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत (२०१९) राष्ट्रवादीने राज्यातील १९ जागांवर स्वतःचे उमेदवार दिले होते. विदर्भातील भंडारा-गोंदिया येथून नाना पंचबुद्धे व बुलडाणामधून डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पक्षाची उमेदवारी दिली, तर अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना समर्थन दिले होते.
गेल्या महिन्यात राज्यातील सर्व मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर पक्षाने आगामी निवडणुकीसाठी सोळा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघांमध्ये पक्षाला यश मिळेल, अशी आशा असून विदर्भातील बुलडाणा व अमरावती मतदारसंघ सध्या सोडण्यात आले आहेत.
येथे समर्थन द्यायचे की हा मतदारसंघ काँग्रेसला सोडायचा, यावर मंथन सुरू असल्याचे एका स्थानिक पदाधिकाऱ्याने सांगितले. दुसरीकडे काँग्रेसने अमरावती मतदारसंघावर दावा ठोकला आहे. तशा प्रकारचे व्यक्तव्य जाहीररीत्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे, तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारांची चाचपणीही झालेली नाही.
राष्ट्रवादीला अद्याप सक्षम उमेदवार सापडू शकलेला नाही. पक्षाकडे उमेदवारीसाठी काही नावे आली असली तरी त्या ताकदीचा उमेदवार मात्र गवसलेला नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच अद्याप तरी राष्ट्रवादीने अमरावती लोकसभा मतदारसंघ केंद्रीत केला नसल्याचे पहिल्या आढावा यादीत दिसून आले आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) मधील घडामोडींची सध्या काही कल्पना नाही. लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघाबद्दल महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मिळून निर्णय घेणार आहेत.
- यशोमती ठाकूर, काँग्रेस आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.