यवतमाळ : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर होताच आता यवतमाळच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लॉबिंग केले जात आहे. त्यासाठी पुसदच्या नाईक बंगला केंद्रस्थानी आहे. तरुण नेतृत्वाला संधी द्यावी अशी मागणी समाज माध्यमातून पक्षश्रेष्ठीकडे केली जात आहे.
पुसदच्या नाईक परिवाराने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनीही अनेक वर्षे मंत्रिपद उपभोगले. नाईकांच्या रूपाने महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला एक नेतृत्व लाभले होते. मात्र, पाच वर्षांत शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहोरागड येथे नगारा कार्यक्रम घेऊन समाजाचे नेतृत्वच आपल्याकडे घेतले. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्याने राजीनामा द्यावा लागला.
यामुळे बंजारा समाजात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांना पालकमंत्री बनवून राष्ट्रवादी काँग्रेसने भरून काढावी अशी मागणी समाजमाध्यमातून केली जात आहे. शिवाय, नाईक परिवारही त्यासाठी पक्षाकडे पाठपुरावा करीत असल्याची माहिती आहे. वनमंत्री हे पद शिवसेनेच्या कोट्यातील आहे. त्यावर काँग्रेसनेही दावा केला आहे. तर विधानसभा अध्यक्षपदही रिक्त आहे. त्यावरही काँग्रेस व शिवसेनेचा डोळा आहे.
नेतृत्वासमोर यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. मात्र, बंजारा समाजावर नाईक घराण्याची असलेली पकड घट्ट राहावी व भाजपपासून दुरावलेला समाज पुन्हा जवळ राहावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद देऊन यवतमाळचे पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी रेटली जात आहे. त्यासाठी समाज माध्यमावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, आमदार इंद्रनील नाईक हे नवखे असून, त्यांना फारसा अनुभव नसल्याचाही प्रतिक्रिया उमटत आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी खिळखिळी झाली आहे. एकसंघ नेतृत्वाचा अभाव आहे. जिल्हाध्यक्ष माजी आमदार ख्वाजा बेग यांनी राजीनामा दिला असून, तो मंजूर झाला आहे. त्यामुळे मुस्लिम समाज राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहे. सत्तेत असल्याशिवाय पक्ष वाढवता येत नाही. आतापर्यंत नाईकांच्या नेतृत्वात असलेला बंजारा समाज दूर जाऊ नये यासाठी नवीन नेतृत्वाला संधी देऊन जिल्ह्यात पक्ष टिकवून ठेवण्याचीच कसोटी पक्ष प्रमुखासमोर आहे.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे अनेक राजकीय संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहे. यात कोण सरस ठरते हे वेळच सांगणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.