मौदा (जि. नागपूर) : एखाद्या शहराकडे किती दुर्लक्ष केले जाते, ते मौद्यात गेल्यावर कळले. लोक जलदगतीने एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जावेत, त्यांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये, यासाठी मेट्रो ट्रेन, इंटरसिटी सुरू केल्या जात आहेत. रस्तेही सिक्स लेन, फोर लेन केले जात आहेत. समृद्धी महामार्ग तर कमालीची स्पीड बहाल करणारा आहे. वायुवेगाने जाण्यासाठी बुलेट ट्रेनची संकल्पनाही सिलिब्रेट केली जात आहे. प्रवासात लोकांचा वेळ वाया जाऊ नये, ही यामागील प्रामाणिक भावना. परंतु , या भावनेला मौद्यात जबरदस्त तडा गेला आहे. एखाद्याला करकचून बांधावे, तसे मौद्याचे झाले आहे.
चार बाजूंनी चार रेल्वे क्राॅसिंगने या शहराला अक्षरश: वेढले आहे. हजारो वाहने आणि लाखो लोक या मार्गांनी रोज प्रवास करतात. परंतु, रेल्वे फाटकावर लोकांना अडकून थांबावे लागते. वाट पाहून-पाहून जीव मेटाकुटीला येतो. कामाचा वेळ प्रतीक्षा करण्यात व्यर्थ जातो. या फाटकांवर उड्डाणपूल बांधण्याची जीवतोड मागणी परिसरातील गावांतील नागरिक वर्षानुवर्षे करीत आहेत. परंतु, इथल्या लोकांच्या मागणीकडे लक्ष द्यायला उसंत कुणाला आहे?
-बाबू अच्छेलाल
बापरे! फक्त एक किमी क्रॉस करायला लागतो एक तास, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण
पारशिवनीहून रामटेकला जायचे ठरले होते. परंतु मौद्याचे तालुका बातमीदार पुरुषोत्तम डोरले यांनी आग्रह केला. त्यामुळे मग थेट मौदा गाठले. प्रवास तसा मोठा होता. बसस्थानकावर पोहोचताच डांगरांची आठवण झाली. मौदा डांगरांच्या वाडीसाठी खास प्रसिद्ध. परंतु, सिझन सुरू न झाल्याने डांगराची मजा चाखता आली नाही. परंतु डोरले यांनी ऐन नदीत असलेल्या महानुभावीयांच्या मंदिरात सकाळी नेले. तेथील प्रसन्न वातावरणामुळे थकवा कुठल्या कुठे पळाला. सिंचनाची बऱ्यापैकी सुविधा असलेला समृद्ध तालुका अशी मौद्याची ओळख आहे. परंतु या परिसरातील लोक रेल्वे क्राॅसिंगमुळे त्रस्त असल्याचे डोरले यांनी सांगितले. आणि आम्ही थेट चाचेर रेल्वे क्रॉसिंग गाठले.
नागपूर जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यात मौद्याची गणना होते. बसस्थानकावर पोहोचताच त्याची कल्पना आली. भंडाऱ्याकडे जाणाऱ्या बसेस स्थानकावर प्रवाशांच्या प्रतीक्षेत होत्या. कोरोनामुळे सध्या जो-तो भीतभीतच ‘लालपरी’चा प्रवास करीत आहे. आम्हीही मास्क, सॅनिटायझर अशा सुरक्षांचा अवलंब करूनच निघालो.
या मार्गावर हवे उड्डाणपूल
हिंगणघाटात होऊ शकते ते मौद्यात का नाही?
मौद्यात असतानाच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याचे सकाळचे बातमीदार मंगेश वणीकर यांचा फोन आला. इकडे कधी येणार बाबू अच्छेलाल? असा प्रश्न त्यांनी विचारला. सहज उड्डाणपुलांचा विषय निघाला. तर त्यांनी हिंगणघाटची माहिती दिली. ‘हिंगणघाट येथे चार-चार उड्डाणपूल आहेत. आणखी दोन उड्डाणपूल कलोडे भवन चौक आणि दवाखाना चौकात बांधण्याचे प्रस्तावित आहेत. त्यासाठी लोकांनी कोणतेही आंदोलन वगैरे केले नाही.’ कोणत्याही मागणीशिवाय हिंगणघाटात उड्डाणपूल होऊ शकतात, तर मोठी मागणी असूनही मौद्यात का नाही, असा प्रश्न पडला.
भंडारा-रामटेक मार्गावर खात येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी पाणी वाहून नेण्यासाठी नाल्यांचे काम सुरू होते. नाल्यावरील काॅंक्रिट खचत असल्याचेही दिसले. साईड रोडमध्ये मुरूम टाकताना रोडवरील खोदकाम केलेला मटेरियलमिश्रित माल टाकला गेला. इथे उभे असलेले लोक सांगू लालगे, मातीमिश्रित मुरूम टाकल्याने पावसाळ्यात रस्ता चिखलमय झाला होता. त्यामुळे येणे-जाणे करणे कठीण झाले आहे. बांधकाम करणाऱ्या कंपनी तक्रार केली असता कर्मचारी व इंजिनिअर समाधानकारक उत्तर देत नाही. पुलाचे काम कासवगतीने सुरू असून निकृष्ट बांधकाम होत असल्याचेही लक्षाच आणून दिले. परंतु त्यावर कोणतीही कारवाई नाही. यासाठीही आंदोलन करावे लागणार काय?, असा सवालही लोकांनी केला.
निमखेडा रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचे काम भाजप सरकारच्या काळात २०१७-१८ साली मंजूर झाले. परंतु, टेंडर काढलेच नाही. काम होल्डवर ठेवण्यात आल्याचे माजी सरपंच यागंटी यांनी सांगितले. अरोली, तुमान, निमखेडा, पारडीकला व इतरही गावांतील लोक या क्रॉसिंगवरून ये-जा करतात. परंतु उड्डाणपूल नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत.
मौद्याहून रामटेक, मनसर व मध्यप्रदेशकडे जाणारा मुख्य राज्य महामार्ग आहे. याच रस्त्यावर चाचेर रेल्वे क्रॉसिंग असल्याने अनेक वाहने उभी असतात. त्यातच या मार्गावर मौदा तालुक्यातील एनटीपीसी, फोरजी, पेन्नार, अल्ट्राटेक व इतर लहान कंपन्या आहेत. त्यामुळे येथील वाहने व कर्मचारी याच मार्गाने ये-जा करीत असतात. रेल्वे क्रॉसिंगजवळील रस्ता पूर्णपणे उखडल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.