नीलिमा यांच्या आत्मनिर्भरतेचा प्रवास 

नीलिमा वैद्य
नीलिमा वैद्य
Updated on

नागपूर : आयुष्यात कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही, असा चंग बांधूनच त्या जगत असतात. नियतीने जरी जन्मत: दिव्यांगता वाट्याला दिली, तरी आपण आयुष्यभर आत्मनिर्भर होऊन जगायचे, हे त्यांनी शालेय शिक्षण घेत असतानाच ठरविले होते. आणि तेथूनच सुरू झाला त्यांचा आत्मनिर्भरतेचा प्रवास. आता त्या स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ग्राहक मदतनीस पदावर रुजू आहेत. त्यांचे नाव आहे नीलिमा वैद्य. 

मुलामुलींना  आत्मनिर्भर होण्यासाठी आवश्‍यक ते शिक्षण दिले

नीलिमा यांचा जन्म 14 जानेवारी 1983 ला वर्धा जिल्ह्यातील जाम येथे झाला. घरी आईवडील, चार बहिणी व एक भाऊ. आता सर्व बहिणींचे व भावांचे लग्न झाले आहे. वडील पांडुरंग वैद्य यांची आधी कोरडवाहू शेती असल्याने घरची परिस्थिती हलाखीचीच होती. तरीसुद्धा घरातील सर्व मुलामुलींना त्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी आवश्‍यक ते शिक्षण दिले. नीलिमा यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या जन्मगावीच झाले. त्यानंतर काही शारीरिक अडचणींमुळे त्या शाळेत जाऊ शकत नसल्याने त्यांनी पाचवी ते सातवीपर्यंतची परीक्षा घरीच राहून खासगीपणे दिली. त्यांच्या मोठ्या बहीण नागपूर येथील मातृसेवा संघात नोकरीला होत्या. त्यांनीच मातृसेवा संघात दिव्यांग मुलींची स्नेहांगण शाळा असल्याची माहिती दिली. तेव्हापासून नीलिमा यांचे आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मातृसेवा संघातील स्नेहांगण शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी धंतोली येथील अहल्यादेवी मंदिरातील वसतिगृहात राहून 12वी पर्यंतचे शिक्षण भिडे गर्ल्स हायस्कूलमधून व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण डीएनसी कॉलेज येथून पूर्ण केले. याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये भरतकाम, विणकाम यासह अनेक गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या. 

समाजसेविका गदरे यांच्याशी ओळख

नागपुरात शालेय शिक्षण घेत असताना त्यांची ओळख समाजसेविका गदरे मॅडम यांच्याशी झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात योग्य दिशेने वाटचाल करायला मिळाली असल्याचे नीलिमा सांगतात. अहल्यादेवी मंदिरमधील वसतिगृहात राहत असताना इतर मैत्रिणींना अभ्यास करताना बघून नीलिमा यांनादेखील स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा झाली. जिद्द व चिकाटीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून त्यांनी 2013 मध्ये जलसंपदा विभागात नोकरी मिळवली. जलसंपदा विभागात एक वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांना स्टेट बॅंक ऑफ इंडियाची संधी चालून आली. आता त्या बॅंकेत ग्राहक मदतनीस या पदावर रुजू आहेत. तसेच स्वतःची गायनाची आवड जोपासत त्यांनी संगीताचे शिकवणी वर्ग लावले आहेत. 

सहकार्य करणारे पालक मिळाले
मला जर सरकारी नोकरी लागली नसती, तर मी माझ्यातील इतर कला विकसित करून आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न केले असते. सरकारी नोकरीमुळे मी माझ्या आईवडिलांना गरिबीमधून बाहेर काढण्यास मदत करू शकत आहे. बेताची परिस्थिती असतानासुद्धा मला सदैव सहकार्य करणारे पालक मिळाले. चांगला मित्रपरिवार मिळाल्याने मानसिक आधार लाभला. प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर असायला हवे. 
-नीलिमा वैद्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.