नागपूर : हिंगणघाटमध्ये घडलेल्या अमानवीय घटनेतील पीडिता गत चार दिवसांपासून असह्य वेदना सहन करत आहे. तिच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात अद्ययावत उपचार सुरू आहेत. पीडिता उपचारांना प्रतिसाद देत असली तरी तिच्यासाठी पुढील सात दिवस महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या नंदोरी चौक परिसरात दारोडा येथील प्राध्यापिका तरुणीच्या अंगावर माथेफिरू विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले व तो तेथून पसार झाला होता. त्याला चार तासांच्या आत पोलिसांनी बुटीबोरी जवळील टाकळघाट एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. घटनेनंतर लगेच पीडित प्राध्यापिकेला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पीडिता मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका आहे. नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता. त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले व पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला होता.
त्याचवेळी तिथून जात असलेल्या सहकारी प्राध्यापिका आणि या मार्गाने जाणाऱ्या इतर युवकांनी तिला विझवून येथील उपजिल्हा रुग्णांलयात दाखल केले, तरुणी गंभीररित्या भाजली असून प्राथमिक उपचारानंतर तिला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणात संशयित म्हणून विकेश नगराळे रा. दारोडा या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रकृती चिंताजनकच
पीडित प्राध्यापिकेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिला वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तरीही येते सात दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तिची श्वासनलिका जळल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत असून कृत्रिम श्वास यंत्रणेवर ठेवले असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. धोका अजून टळलेला नसून प्रकृती चिंताजनक असल्याचे उॉक्टरांचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. महिला आणि महाविद्यालयीन युवतींच्या संतप्त भावना पहावयास मिळाल्या. हिंगणघाटमध्ये सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला होता. मोर्चात हजारोच्या संख्येने स्त्री पुरुष लहान मुले नागरिकांनी सहभाग नोंदविला.
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदा करण्याची गृहमंत्र्यांनी दिली ग्वाही
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी रात्री रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून पीडितेच्या तब्येतीची केली विचारपूस केली. अशाप्रकारचे कृत्य करणा-या गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर लवकराच लवकर कायदा करणार असल्याची ग्वाही यावेळी गृहमंत्र्यांनी दिली.
संसदेतही उमटले होते पडसाद
या घटनेचे पडसाद मंगळवारी संसदेतही उमटले होते. महिलांनी किती अत्याचार सहन करायचा? महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर अतिशय कडक कायदा केला पाहिजे, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यांनी संसदेत केली. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांवर तातडीने न्याय होत नाही. फक्त 'तारीख पे तारीख' दिली जाते, असा संताप त्यांनी यावेळी खासदार नवनीत राणा यांना व्यक्त केला होती. एकतर्फी प्रेमातून प्राध्यपिकेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. या घटनेत ती प्राध्यापिका 40 टक्के भाजली अहे.
उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपविणार प्रकरण
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत राष्ट्रीय जळीत केंद्र मुंबईचे प्रमुख डॉ. सुनील केशवानी होते. डॉ. केशवानी यांनी पीडितेवर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून तिला मुंबईला हलविण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. हे प्रकरण ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपविणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.