पुसद (जि. यवतमाळ) : अतिवृष्टी, ओल्या दुष्काळामुळे यंदाच्या खरीप हंगामाला चांगलाच फटका बसला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांची आता रब्बी हंगामावर भिस्त आहे. यंदा ओढे, नाले, विहिरींना भरपूर पाणी आहे. मात्र, अखंडित व पुरेशा विजेअभावी रब्बी हंगामावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशी स्थिती असल्याने रब्बी हंगामही बुडणार का, अशी धडकी शेतकऱ्यांच्या मनात भरली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात एकूण रब्बी हंगाम लागवड क्षेत्र किमान पाच लाख हेक्टरवर आहे. सध्या गहू, हरभरा पेरणीची लगबग चालू आहे. या पिकांसाठी सिंचनाची आवश्यकता आहे. यंदा जलस्रोतांना पुरेसे पाणी आहे. मात्र पिकांना सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध नाही. आठवड्यातून केवळ तीन दिवस सिंचनासाठी वीज पुरविण्यात येते.
त्यातच विजेचा लपंडाव व कमी दाबामुळे सिंचनामध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे. अशा स्थितीत रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून जाणार का, अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. वीज वितरण कंपनीकडून सिंचनासाठी खंडित पुरवठा होत असल्याने कृषी क्षेत्रातील सिंचनात मोठा अडसर निर्माण झाला आहे.
याबाबतीत शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणावर तक्रारी असून त्याकडे लोकप्रतिनिधीही लक्ष देत नसल्याचा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. बरेचदा कमी दाबामुळे विद्युत रोहित्र जळण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणावर घडतात.
त्यानंतर या रोहित्र दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना वारंवार वीज कंपनीकडे दाद मागावी लागते. वेळच्या वेळी या विजेची तांत्रिक देखभाल दुरुस्ती होत नाही. प्रत्यक्षात वीज वितरण कंपनी तातडीने रोहित्र दुरुस्ती व पुरवठा करण्यात पुढाकार घेत नाही. यासाठी लोकप्रतिनिधींकडे साकडे घालूनही अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येते. अशावेळी शेतकऱ्यांनी जावे कुठे? याचे उत्तर मिळत नाही.
विदर्भात ११ हजार ५०० मेगावॉट वीज निर्माण होते. परंतु, दुर्दैवाने त्यापैकी केवळ दोन हजार २०० मेगावॉट वीज शेतकऱ्यांना विदर्भाला मिळते. उर्वरित सर्व वीज पश्चिम महाराष्ट्राला जाते. त्यापैकी औद्योगिकीकरण व पश्चिम महाराष्ट्रात एकूण विद्युतपंपाची संख्या ही २३ लाख १९ हजार आहे. विदर्भात केवळ आठ लाख १७ हजार एवढी आहे.
ही अधिकृत शासकीय आकडेवारी २०२२-२३ ची असून या सर्व कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनावर याचा विपरीत परिणाम झालेला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून ’कुसुम सौर ऊर्जा ’पर्याय दिला आहे, मात्र, या योजनेची व्याप्ती व अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. यासाठी लाभार्थी निवडप्रक्रियेची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे.
विद्युत रोहित्र जळण्याचे प्रमाण मोठे आहे. विजेचा वाढलेला दाब तसेच विद्युत रोहित्राचा गुणवत्तापूर्ण नसलेला दर्जा यामुळे हे प्रकार वाढले आहेत. रोहित्र जळाल्यानंतर ते तातडीने बदलून मिळत नाही, वा दुरुस्त केल्या जात नाही.
दुरुस्ती करताना तांब्याच्या तारांऐवजी अॅल्युमिनियम तार वापरल्या जाते. त्यामुळे रोहित्र पुन्हा जळण्याचे प्रकार पहावयास मिळतात. विजेअभावी सिंचन होऊ शकत नाही. त्यामुळे पिके करपण्याचे अनेकदा प्रकार घडतात. वितरण कंपनीने चांगल्या दर्जाचे रोहित्र पुरविणे व तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
मागील दोन दशकापासून शेतकर्यांकडून विजेच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. राज्य शासन उपाययोजना करण्यात असमर्थ ठरले आहे. सध्या विदर्भाचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस असून त्यांनी या कायम उपेक्षा होणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनातील अवरोध दूर करून न्याय द्यायला हवा.
’रब्बीसाठी नियमित वीजपुरवठा आवश्यक आहे. वीजटंचाईमुळे शेतकऱ्यांना रात्री ओलित करावे लागते. हा गंभीर प्रश्न आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचनातील अवरोध दूर करावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
-मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यवतमाळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.