गोंदिया : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त ही सालेकसा तालुक्यांची ओळख आहे. या तालुकास्थळापासून 20 किलोमीटर अंतरावर दरेकसा हे गाव. दरेकसापासून 10 किलोमीटर अंतरावर टेकाटोला व नंतर त्याच्याही पुढे दोन-अडीच किलोमीटरच्या परिसरात मुरकुडोह 1, मुरकुडोह 2, मुरकुडोह 3, दंडारी ही गावे आहेत. या पाचही गावांतील सर्व रहिवासी गोंड समाजाचे. आताच्या "डिजिटल इंडिया'च्या युगात या गावातील विकासाच्या पाऊलखुणा शोधायचा प्रयत्न "सकाळ'ने केला असता मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया या गावांत फेल झाल्याचे दिसले. प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारे हे चित्र आहे.
आम्ही दरेकसावरून टेकाकोलाला निघालो. सातपुडा आणि मायकल पर्वताच्या त्रिकोणी संगमाच्या मधोमध ही गावे वसली आहेत. घनदाट जंगल, पहाड, जंगली जनावरे याच्या सान्निध्यातील ही गावे. त्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेत, पण ओबडधोबड रस्त्याने टेकाकोलाला पोहोचलो. गावाजवळ पोहोचताच दिसते गावाचे स्वागतकमान. केवळ लोखंडी खांब... गंज लागलेले...वरचा फलक बेपत्ता. गावात प्रवेश होतो खड्डेयुक्त रस्त्यांनीच. दरेकसा ग्रामपंचायतीत दरेकसा सोबतच टेकाकोला आणि मुरकुडोह 1, मुरकुडोह 2, मुरकुडोह 3, दंडारी या पाच गावांचा समावेश आहे. दरेकसा वगळता या पाचही गावांची एकूण लोकसंख्या हजाराच्या आसपास. ग्रामपंचायतीत जायचे असेल, तर 10-12 किमी अंतरावरच्या दरेकसालाच जावे लागते.
कोणत्याही मानवी वस्तीचे जिवंतपण तेथील मुलाबाळांच्या कलकलाटात असते. आम्ही या पाचही गावात फिरलो. पण तो कलकलाटच जाणवला नाही. कारण 12 वर्षे वयावरील मुलेच गावात नाही. चौकशी केली तर कळले की, सर्वच गावांत जवळजवळ प्रत्येकांच्या मूल आहे. पण, ती सर्व पाच वर्षे वयापेक्षा लहान. मग त्यापेक्षा मोठी मुले गेली कोठे? गावातल्या एकाला त्याबाबत विचारले... त्याने सांगितले ते धक्कादायकच होते.
या पाचही गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या. मात्र, त्यात कोणताही शिक्षक यायलाच तयार नव्हता. दोन वर्षांपूर्वी जि. प.ने शाळा बंद केल्या. शेवटी पालकांनी आपल्या पोटच्या गोळ्यांना केवळ शिक्षणासाठी दरेकसा, पिपरिया अन् सालेकसा येथील निवासी आश्रमशाळेत ठेवले. एखाद्या रविवारी आश्रमशाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना पालकांशी भेटायला गावांत आणतात आणि दुपारी पुन्हा घेऊन जातात. पाणावलेल्या डोळ्यांनी मुलांना निरोप देण्यापलीकडे आईवडिलांकडे काहीच नसते. सरकार एकीकडे डिजिटल शाळांचे स्वप्न जनतेला दाखवत आहे. अन् येथे साधी प्राथमिक शाळा नाही.
या पाचही गावांत 1-2 मुलेच शाळेत येत होती. कालातंराने ही पटसंख्या शून्य झाली. त्यामुळे शासनाने दोन वर्षांपूर्वी येथील शाळा बंद केल्यात.
- एस. बी. वाघमारे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, सालेकसा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.