अमरावती : ‘नागपुरी संत्रा’ म्हणून खूप गाजावाजा केला जातो. परंतु ‘नागपुरी संत्रा’ खराखुरा मोर्शी आणि वरुड या पट्टयात होतो. हा परिसर संत्र्यांच्या उत्पादनात अव्वल आहे. त्यामुळे या परिसराचा गुणगौरव ‘कॅलिफोर्निया’ म्हणून खूपदा केला जातो. परंतु नेते फक्त गुणगौरव करण्यासाठी तोंड उघडतात. संत्रा उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्या मुस्काटांना आपोआप कुलूप लागते. संत्रा उत्पादकांसाठी आम्ही अमूक करू, ढमूक करू म्हणून इलेक्शनपुरती घोषणाबाजी करतात. एकदाचे आमदार-खासदार-मंत्री झाले की संत्रा सडू द्या नाहीतर शेतकरी मरू द्या त्यांना काहीच सोयरसुतक नसते. फक्त घोषणाबाजी करण्यात ते वस्ताद असतात.
सन्नी देवलचा ‘तारीख पे तारीख’ हा डाॅयलाॅग खूप फेमस आहे. इथे ‘घोषणा पे घोषणा’ करणारे राजकारणातही ‘अभिनेते’ दिसतात. एवढ्या वर्षांत एकही यशस्वी संत्रा प्रक्रिया प्रकल्प सरकारला उभारता आला नाही. तारीख पे तारीख बघा १९५७, १९६३, १९९२, १९९५, २०१४, २०१७, २०१९. आता २०२१ च्या अर्थसंकल्पातील संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची घोषणा म्हणजेही एकप्रकारे तारीखच दिली गेली. या तारखा नि घोषणा कधीच फळाला आल्या नाहीत. काही प्रकल्प सुरू होण्याच्या आधीच सुपडासाफ झाले. तर काही हवेतल्या हवेतच गायब. २०१४ ला इथल्यासाठी जाहीर झालेला प्रकल्प नांदेडच्या नेत्यांनी पळवला. तो तिथे व्यवस्थित सुरू आहे. इथून तिथे संत्री नेतो म्हटले तर बोकांडी बसणारा अतिरिक्त भार पेलण्याची क्षमता शेतकऱ्यांत नाही. ‘तारीख पे तारीख’ देणाऱ्यांना आता शेतकऱ्यांनी त्यांचा ‘ढाई किलोका हाथ’ दाखविणे गरजेचे झाले आहे.
मोर्शीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. सकाळपासून उन पडले होते. बसचे टप्परही गरम झाले. त्यामुळे घामाजोकळ झालो. तसा दुपट्टा डोक्याला बांधलाच होता. बसस्टाॅपवर मोर्शीचे तालुका बातमीदार शेखर चौधरी आणि शहर बातमीदार शरद कणेर पोहोचले होते. उतरताच त्यांनी खास मोर्शी स्टाईलने स्वागत केले. मी आधी टपरीवर थंडगार पाण्याचे घोट घेतले. गारेगार पाणी पोटात गेल्याने जरा बरे वाटले. झणझणीत मिसळची ऑर्डर तोवर दिली गेली. पोटाची आग जरा कमी झाली आणि मग तिघेही निघालो. जयस्तंभ चौकात आलो. संत्राव्यापारी आकाश भोंडे यांच्याशी ओळख करून दिली. मग आमच्या चर्चा रंगल्या. भोंडे साहेबांनी अडचणींचा पाढाच वाचला.
मोर्शी तालुक्यात फेरफटका मारल्यास संत्र्याच्या शेकडो बागा दृष्टीस पडतात. संत्र्याला योग्य भाव आणि बाजारपेठ मिळत नसल्याने या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात मोर्शी तालुक्यात संत्रा प्रकल्प उभारला जाणार अशी घोषणा यंदाही झाली. परंतु आजवरच्या अनुभवातून शेतकरी शहाणे झाले आहेत. त्यांचा आता असल्या घोषणाबाजीवर फारसा विश्वास नसल्याचे दिसले.
मार्केटिंग करण्यात अपयश
नागपुरची संत्री जगप्रसिद्ध आहे. आंबटगोड चवीचं हे फळ सर्वांनाच आवडते. इतर फळांच्या तुलनेत संत्री स्वस्त असल्याने अगदी सर्वसामान्य नागरिकांना संत्री विकत घेणे नेहमीच परवडते. शिवाय संत्र्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ए, कॅल्शियम, फायबर्स, मॅग्नेशियम असल्याने ते शरीरासाठी फायदेशीर ठरतात. संत्र्यामध्ये कॅलरीज कमी असल्याने तुमचे वजनही नियंत्रित राहते. तसेच संत्र्याचा वापर सौंदर्य वाढविण्यासाठी केला जातो. म्हणूच ‘आरोग्याचा मंत्र, रोज खा संत्र’ अशी म्हण प्रचलित झाली आहे. ‘ॲन ॲपल अ डे. किप्स दी डाॅक्टर अवे’, असे सफरचंदाच्या बाबतीत झालेले मार्केटिंग संत्र्यांच्या बाबतीत करण्यात यश मिळाले नाही.
संत्रा उत्पादक शेतकरी माघारला
कुठल्याही उद्योगाला राजाश्रय असणे गरजेचे असते. राजाश्रयातून ऊस, द्राक्ष, डाळिंब पिकवणारा शेतकरी कोट्यधीश झाला. परंतु संत्रा उत्पादक शेतकरी स्थानिक नेतृत्वाच्या इच्छाशक्तीअभावी मागासलेला राहिला. लाखो टन संत्र्याचे दरवर्षी उत्पन्न घेणाऱ्या या प्रदेशात एकही सक्षम प्रक्रिया उद्योग उभा करण्यात शासनाला यश आले नाही.
संत्रा उत्पादकांपुढील चिंतेचे विषय
-गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने भूगर्भातील कमी झालेली पाण्याची पातळी
-प्रशासकीय नियोजनाचा अभाव
-रोगमुक्त किंवा नैसर्गिक बदलाला प्रतिकार करणाऱ्या एकाही वाणचा शोध नाही
-एनआरसीसीसारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांवरील कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ
बांधावर हवे पाणी, माती परीक्षण केंद्र आणि संत्रा ज्युस प्रकल्प
अप्पर वर्धा धरणातून पाणी शेतकऱ्यांना स्वतः न्यावे लागते. हे फार खर्चिक काम आहे. इतर शेतकरीसुद्धा त्यांच्या शेतातून पाण्याचे पाईप नेताना अडवणूक करतात. याकरिता शासनाने योजना राबवून बांधावर पाणी देणे गरजेचे आहे. त्यासोबतच संत्रा ज्यूस प्रकल्प तालुक्यात झाल्यास लहान संत्री (चुरा) सुद्धा विकली जातील. ज्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. तालुक्यात शासकीय माती परीक्षण केंद् असणे गरजेचे आहे.
खर्च वाढतोय, उत्पन्न कमी
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज, पाणी, शेतीला कुंपण, प्रक्रिया केंद्र, संत्र्यासाठी वाहतूक व्यवस्था या सर्व गोष्टी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. खते व फवारे यांचा जास्त वापर होत असल्याने आणि ती महाग असल्याने उत्पादनाच्या मानाने खर्च वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला जास्त उत्पन्न मिळत नाही.
-नवीनकुमार पेठे,
शेतकरी
बाजारपेठेतील भाव रोज कळावा
संत्र्याचे उत्पादन वाढवण्याचा सल्ला शासनाकडून दिला जातो. परंतु उत्पादन वाढले की संत्र्याला भाव नसल्याने लागणारा खर्च निघत नाही. दर दिवसाला बाजारपेठेतील संत्र्याचा भाव शेतकऱ्यांना माहीत होईल, याची व्यवस्था तालुक्याच्या ठिकाणी होणे आवश्यक आहे. जेणेकरून व्यापाऱ्यांकडून होणारी लूट काही प्रमाणात कमी होईल.
-मोरेश्वर गुडधे, उपाध्यक्ष,
मोर्शी तालुका सहकारी शेतकरी खरेदी-विक्री
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.