अहेरी (जि. गडचिरोली) : सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात सारेच अस्वस्थ आणि घाबरलेले आहेत. मात्र येथील एका परिचारिकेने कोरोना रुग्णांची सेवा करताना झालेल्या कोरोना संसर्गाला हरवत त्यातून बाहेर पडल्यावर प्लाझ्मा दान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. समाजसेवेची अशी अनोखी प्रेरणा देणाऱ्या या परिचारिकेचे नाव प्रेरणा झाडे, असे आहे.
सुमारे आठ महिन्यांपासून कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. त्याचा सर्वांत जास्त ताण आरोग्य विभागावर आला आहे. अचानक उभे ठाकलेले फार मोठे संकट, त्यात आपल्या देशात असलेली अपुरी व्यवस्था त्यामुळे असलेल्या यंत्रणेवरच पूर्ण भार आला आहे. येथील अहेरी उप जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली परिचारिका प्रेरणा झाडे यांनी या काळात कोरोना रुग्णांची सातत्याने सेवा केली.
आठ महिन्यांपासून जिवाची पर्वा न करता अथक व अविरत लढा देताना प्रेरणाला त्याच आजाराला सामोरे जावे लागले. पण, न खचता प्रेरणा झाडे यांनी या आजारावर लीलया मात केली. कोरोनाला हरवत पुन्हा जिगरबाज योद्ध्याप्रमाणे त्या कर्तव्यावर रुजूदेखील झाल्या. त्यांनी कोविड रुग्णांची सेवा अजिबात थांबू दिली नाही. दरम्यान, अहेरीतील विठ्ठल रखुमाई विवाह सोहळा समिती व चिराग युथ फाउंडेशन, वडसा यांच्या वतीने स्व. राजे सत्यवानराव महाराज यांच्या जयंतीप्रीत्यर्थ प्लाझ्मा दान शिबिर आयोजित करण्यात आल्याचे कळताच प्रेरणाने तेथेही पुढाकार घेतला. प्लाझ्मा दान करण्याची इच्छा दर्शवली.
नवीनच असलेल्या या उपक्रमात भल्याभल्यांनी सहभाग दर्शविण्यास असहमती दर्शवली होती. मात्र प्रेरणाने सर्वांत आधी प्लाझ्मा दान केले. एवढेच नव्हे तर प्लाझ्मा दान करणाऱ्या या शिबिरातील त्या एकुलत्या एक महिला आहेत. त्यांच्या या धाडसाचे व औदार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अहेरीतील विठ्ठल रखुमाई विवाह सोहळा समिती व चिराग युथ फाउंडेशन, वडसा यांच्या वतीने स्व. राजे सत्यवानराव महाराज यांच्या जयंतीप्रीत्यर्थ आयोजित प्लाझ्मा दान शिबिरात १७ जणांनी सहभागी होत प्लाझ्मा दान केला. विशेष म्हणजे, हे या परिसरातील पहिलेच व जिल्ह्यातील दुसरे शिबिर आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी अगोदर प्रतीपिंड (अँटीबॉडीज) तपासणी आवश्यक असते. त्यासाठी आदल्या दिवशी ४० व्यक्तींनी तपासणी केली. त्यात २६ व्यक्ती पात्र आढळल्या. त्यातील १७ व्यक्तींनी प्लाझ्मा दान केले. भारतातील सर्वांत मोठी ब्लड बॅंक असलेल्या लाइफ लाइन या नागपुरातील ब्लड बॅंकेच्या चमूने प्लाझ्मा संकलन केले. या संस्थेचे संचालक डॉ. हरीश वरभे स्वतः हजर होते. तसेच माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व सीआरपीएफच्या ३७ बटालियन अहेरीचे कमांडन्ट श्रीराम मिना व रामरस मिना यांची प्रमुख उपस्थिती होती.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.