'जय-विरू'चं अनोख प्रेम! एक बैल हातपंपावर पाणी हापसतो, तर दुसरा पितो

one bull drain the water from hand pump and other drink in binagunda village of gadchiroli
one bull drain the water from hand pump and other drink in binagunda village of gadchiroli
Updated on

गडचिरोली : शोले चित्रपटातील जय-विरू म्हणजे मैत्रीचे अजरामर प्रतीक आहे. चित्रपटाच्या क्‍लायमॅक्‍समध्ये विरूच्या हातात प्राण सोडणारा जय अनेकांच्या डोळ्यात पाणी आणायचा. त्यामुळे मैत्री हा शब्दच जय-विरू झाला. असेच जय-विरू भामरागड तालुक्‍यातील बिनागुंडा या अतिदुर्गम गावात आहेत. मात्र, हे जय-विरू माणसाच्या रूपात नसून ते बैल आहेत. त्यांनी आपल्या मैत्रीसाठी हातपंपावर स्वत:च पाणी पिण्याची करामत सुरू केली आहे. यातील एकजण चक्‍क हातपंपावर पाणी हापसतो, तर दुसरा पाणी पितो. ऐकूण आश्चर्य वाटलं ना? पण, हे खरं आहे.

भामरागड तालुक्‍यातील बिनागुंडा हे गाव बडा माडीया या जमातीच्या आदिवासींचे निवासस्थान आहे. या अतिदुर्गम गावात पोहोचण्यासाठी बरेच डोंगर पार करावे लागतात. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावाच्या पलीकडे अबुझमाडचे जंगल आणि डोंगराळ प्रदेश आहे. त्यामुळे नक्षलवादाचे सावट या सर्व परिसरात असते. ऐरवी निसर्गसौंदर्य आणि नक्षलवादासाठी चर्चेत असलेले हे गाव सध्या एका बैलजोडीसाठी चर्चेत आले आहे. येथील ही बैलजोडी रामाजी दुर्वा यांची असून यातील बैलांची अतूट मैत्री बघून त्यांना आता सारेच जय-विरू म्हणतात. आपण नेहमी गाय, म्हशी बैलांना पाणी पिताना बघतो. एकतर पशुपालक त्यांना नदी, कालवा, तलावात पाणी प्यायला नेतात किंवा स्वत: त्यांच्यापुढे पाणी ठेवतात किंवा हातपंपावर पाणी हापसून त्यांना पाजतात. पण, या बैलजोडीला एकदा अतिशय तहान लागल्यावर कुणाचीच मदत मिळाली नाही. तेव्हा आपल्या तहानलेल्या मित्रासाठी जयने हातपंपावर दांडा तोंडाने पकडून पाणी हापसायला सुरुवात केली. काही वेळात हातपंपातून पाणी यायला लागले. विरूने घटाघटा पाणी पित आपली तहान भागवली. तहान भागल्यावर तो मित्राची मदत विसरला नाही. त्याने देखील तसेच पाणी हापसत जयची तहान भागवली. तेव्हापासून हे दोन्ही बैल माणसांच्या मदतीशिवाय हातपंपावर स्वत:च पाणी पिऊ लागले.

हातपंपावर अशा प्रकारे पाणी पिण्यात ते अधिकच तरबेज झाले. त्यांचे हे कृत्य ग्रामस्थांसाठी आश्‍चर्याचा, चर्चेचा आणि कौतुकाचा विषय झाला. मात्र, ही बाब इतर गावात सांगायचे तेव्हा कुणी विश्‍वास ठेवायचे नाहीत. शेवटी बिनागुंडा येथील विनोबा प्राथमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापक सुनील गव्हारे यांनी हे अनोखे दृश्‍य आपल्या कॅमेरात कैद केले. त्यांनी ही माहिती उपेंद्र रोहणकर यांना दिली. आता ही जय-विरूची जोडी आपल्या या तृष्णातृप्तीच्या अनोख्या पद्धतीमुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाली आहे.

कुंवार जंगलाचा प्रदेश -
भामरागड तालुक्‍यातील बिनागुंडा गावाचा परिसर आजही कुंवार जंगलाचा प्रदेश आहे. नक्षलवाद्यांचे सावट, अतिदुर्गम डोंगरी मार्ग, घनदाट जंगल यामुळे येथे फारसे कुणी जात नाहीत. मात्र, मागील काही वर्षांत बिनागुंडा गावात बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. विशेष म्हणजे या गावाजवळ असलेला बाराही महिने वाहणारा राजीरप्पा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मे महिन्यातील रखरखत्या उन्हातही हा धबधबा ओसंडून वाहत असतो. येथील बडा माडीया जमातीची आदिम संस्कृती, हिरव्या रानात लपलेली घरे आणि अंगणातील गोर्गा वृक्ष हे सारेच विलक्षण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.