चंद्रपूर : राज्य शासनाच्या राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत आमचं गाव आमचा विकास हा कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत बुधवारी (ता. 9) जिल्हा परिषद सदस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गावविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कार्यशाळेत अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी बुट्टी मारली. 55 सदस्यसंख्या असलेल्या या कार्यशाळेला केवळ पंचवीस सदस्य हजर होते. त्यामुळे गावविकासाच्या दृष्टीने या सदस्यांची काय तळमळ आहे हे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती, काँग्रेस, भाजप गटनेत्यांनी कार्यशाळेला दांडी मारली.
चौदावा वित्त आयोग लागू करण्यात आल्यानंतर ग्रामपंचायतींना आराखडा तयार करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिले. त्यानुसार ग्रामपंचायतींना पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करावा लागतो. ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नापैकी दीड ते दोन पट विकासकामांचे आराखडे तयार कराव्या लागतात. मोठ्या प्रमाणावर विकासकामांचे आराखडे तयार करण्यात येत असल्याने यातील अनेक कामे रखडतात. त्यामुळे आता राज्य शासनाने थोडा बदल केला. पाच वर्षांऐवजी एका वर्षाचा आराखडा सादर करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. विकास आराखड्यात जिल्हा परिषद सदस्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने जिल्हा परिषद सदस्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेसाठी तीन दिवसांपूर्वीच 55 जिल्हा परिषद सदस्यांना निरोप देण्यात आले.
कार्यशाळेची संपूर्ण माहिती सदस्यांना पंचायत विभागाने दिली. त्यानुसार बुधवारी (ता. 9) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सकाळी नऊ वाजतापासून प्रशिक्षण कार्यशाळेला सुरुवात झाली. या कार्यशाळेला संदीप सुखदेवे, उद्धव साबळे, प्रमोद गजपुरे, योगिता लांडगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यशाळेत जीपीडीपीची पार्श्वभूमी, ओळख, योजनांचे अभिसरण, जीपीडीपीसंदर्भात जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका व जबाबदारी, नमुना आराखडा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार होते. जिल्हा परिषदेत 55 सदस्य आहेत. मात्र, महत्त्वपूर्ण विषयाच्या अनुषंगाने आयोजित या कार्यशाळेत भाजप, काँग्रेसच्या अनेक सदस्यांनी दांडी मारली. त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रेखा कारेकार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नीतू चौधरी, भाजपचे गटनेते देवराव भोंगळे, काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूरकर यांच्यासह अनेक सदस्यांचा समावेश होता.
जीपीडीपी कार्यक्रम हा गावविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यात गावाचा विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी जिल्हा परिषद सदस्यांची आहे. मात्र, याच महत्त्वाच्या कार्यशाळेला अनेक सदस्यांनी बुट्टी मारल्याने गाव विकासाची त्यांची तळमळ दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत.
उपाध्यक्ष, सभापती, गटनेत्यांची बुट्टी -
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रेखाताई कारेकार, महिला व बालकल्याण सभापती नीतू चौधरी, काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर, भाजपचे गटनेते देवराव भोंगळे हे कार्यशाळेला गैरहजर होते. मंगळवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेलाही उपाध्यक्ष, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चौधरी गैरहजर होत्या. त्यांच्या गैरहजेरीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.