वरुड - विदर्भाचा कॅलिफोर्निया, अशी बिरुदावली मिरविणाऱ्या वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा ही अधिकच बिकट आहे. ड्रायझोनचा शिक्का माथ्यावर असल्याने सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमध्ये संत्रा उत्पादक शेतकरी होरपळला असून संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. ड्रायझोन मात्र विसाव्या वर्षीही घट्ट पाय रोऊन आहे, असे असले तरी ड्रायझोन हटविण्यासाठीचे व्हीजन मात्र ड्रायच असल्याचे दिसून येते.
जमिनीतील पाण्याचा अतिउपसा व यामुळे खालावलेली पाण्याची पातळी बघता २००४ साली वरुड तालुक्याला ड्रायझोनच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून तालुक्याच्या माथ्यावर लागलेला ड्रायझोनचा शिक्का कुणीही पुसू शकले नाही. संत्राशेतीला भरपूर पाण्याची गरज असते, हे शेतकरी जाणून असल्याने शेतकऱ्यांनी शेतात विहिरी खोदल्या. त्यातून संरक्षित ओलिताची सोय केली.
मात्र कालांतराने झालेले अल्प पर्जन्यमान तसेच संत्राबागा जगविण्यासाठी जमिनीतील पाण्याचा झालेला अतिउपसा यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली. परिणामी विहिरीचे पाणी खोल गेले, बोअर निकामी झाले. जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने हजारो फुटांपर्यंतचे बोअरही निकामी ठरले. या सर्व परिस्थितीचा परिपाक म्हणून तालुक्यावर ड्रायझोनचे शिक्कामोर्तब झाले ते आजतागायत कायमच आहे.
नेत्यांचे व्हीजनही ड्राय
संत्राशेतीला ओलितासाठी संरक्षित पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांनी जिवाचा आटापिटा चालविला. पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. यात शेतकरी कर्जबाजारी झाला. मात्र तरीही बहुतेक शेतकऱ्यांच्या पदरी अपयशच आले. ड्रायझोनमुळे पाण्यावर निर्बंध आले. संत्राशेती कोलमडली. शेतकरी हवालदिल झाला. मात्र याची खंत कुणालाच झाली नाही. गेल्या वीस वर्षांत एकही लोकप्रतिनिधी तालुक्यावर लागलेला ड्रायझोनचा कलंक पुसण्यासाठी पुढे सरसावला नाही. शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे व्हीजनही शेवटी ड्रायच ठरल्याचे दिसून येते.
बोअरचा गोरखधंदा जोमात
२००४ पासून तालुका ड्रायझोनच्या यादीत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना आपल्या संत्राबागा जगविण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे, हे ओळखून तालुक्यात परप्रांतीय बोअर करणाऱ्या बोअर मशीन धडाक्यात बोलवल्या जातात. अव्वाच्या सव्वा किमती ठरवून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन राजरोसपणे बोअरचा धडाका सुरू झाला. यात अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण व्यवहार करून हितसंबंध जोपासून हा अवैध बोअरचा गोरखधंदा ड्रायझोनच्या नावाखाली सर्रास सुरू आहे.
आश्वासने फोल, विहिरी मात्र खोल
गेल्या वीस वर्षांत चार विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी तालुक्यातील ड्रायझोन हटविण्यासाठी सर्वांनीच आश्वासने दिली. मात्र निवडणूक संपल्यावर आश्वासने हवेत विरली. तरीही ड्रायझोन मिटविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. शेवटी संत्राबागांचा दिवसेंदिवस पाण्याअभावी ऱ्हास सुरूच राहिल्याने शेतकऱ्यांनी पाण्याच्या शोधात विहिरी खोल करण्याचा सपाटा सुरूच ठेवला. यात विहिरी तर खोल झाल्या, मात्र आश्वासने फोल ठरल्याचेच दिसून आले.
वरुड तालुक्यात ड्रायझोन असल्याने सिंचनाची सुविधा निर्माण करता येत नाही. त्यामुळे संत्राबागांचे भविष्य अंधारात आहे. दिवसेंदिवस संत्राशेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांना खुलेआम सिंचनाच्या सोयी निर्माण करण्यात अडचण आहे. ड्रायझोन हटविण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्यात यावे, यासाठी वर्धा डायव्हर्शन हा योग्य प्रकल्प आहे.
- नरेंद्र पावडे, सभापती, बाजार समिती.
ड्रायझोनमुळे आम्हाला बोअर किंवा विहिरीचे खोदकाम करता येत नाही. करायचे झाल्यास जास्तीची रक्कम देऊनही चोरून काम करावे लागते. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्यापेक्षा सर्व खुले करून दलाल व अधिकाऱ्यांचे खिसे भरणे बंद केले पाहिजे.
- सागर भोंडे, संत्रा उत्पादक शेतकरी, राजुराबाजार.
सध्या गेली तीन-चार वर्षे चांगला पाऊस पडतो आहे. मागील वर्षी अतिवृष्टी झाली. तालुक्यातील पावसाची सरासरी ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे निश्चितच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली असेल. मात्र ड्रायझोन हटविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत, ही खेदाची बाब आहे. शासकीय अनास्था, वेळकाढू धोरणे राजकीय दृष्टिकोन, अशी अनेक कारणे या परिस्थितीला कारणीभूत आहेत.
- शिवाजी ठाकरे, सरपंच, हातुर्णा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.