शेंदूरजनाघाट (अमरावती : वरुड तालुक्यातील संत्राझाडांवर यंदा चांगला आंबिया बहार फुलला नाही. तथापि, अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने झाडे खराट्यासारखी होत असून पिवळी पडत आहेत. अशा झाडांवर फळे राहतील तरी कशी0 अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
शेकडो हेक्टर संत्राबागांमध्ये आंबिया बहार फुलला नाही. मात्र संत्राझाडांवरील अज्ञात रोगामुळे पानगळ सुरू झाली. यामुळे झाडे खराट्यासारखी होत असल्याचे दिसून येत आहे.
झाडावर बारीक शंखू असल्याने मोठमोठ्या फांद्या वाळत असून, अवकाळी पाऊस आला तेव्हापासून शेंडेवाढ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे मृगबहार फुलणार की नाही0 अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी अतिपावसामुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत संत्राबागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. त्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या संत्राफळांवर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाययोजना करून फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले.
मात्र संत्र्याला भाव मिळाला नसल्याने मोर्शी आणि वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत असताना परत झाडाच्या फांद्या वाळण्याचे संकट त्यांच्या मानगुटीवर बसले आहे.
शेंदूरजनाघाट परिसरात संत्रापिकावर शेतकऱ्यांचे सर्वच अवलंबून आहे. या पिकावर त्यांचा वर्षभराचा व्यवहार असतो. परंतु संत्र्याला मागील वर्षी पाहिजे तसे भाव मिळाले नाहीत.
यामुळे शेंदूरजनाघाट परिसरातील शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र निराशा झटकून या वर्षाला संत्राझाडांची योग्य मशागत केली. नांगरणी, वखरणी, शेणखत, रासायनिक खते टाकून फवारणी केली.
परंतु तरीदेखील आंबिया बहार चांगला फुटला नाही व झाडे खराब होत आहेत. कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन करावे व शासनाने फवारणीकरिता मोफत औषध पुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे.
शेतकरी संकटातून बाहेर पडेना
सातनूर, पुसला, वाई, धनोडी, मालखेड, झटामझिरी, वरुड, जरुड, लोणी, चांदस वाठोडा, सुरळी कुरळी, तिवसाघाट, बेनोडा, हिवरखेड, पुसली या परिसरात शेतकरी आंबिया बहार मोठ्या प्रमाणात घेतात, पण कधी नैसर्गिक संकट तर कधी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.