ओरिसातील भटकलेले वन्य हत्ती गडचिरोलीत

छत्तीसगड मार्गे आगमन; वनविभागासमोर नवे आव्हान
elephant
elephant sakal media
Updated on

गडचिरोली : ओरिसा राज्यातील वन्य हत्तींच्या मागील एक वर्षापासून भरकटलेल्या कळपाने मागील तीन ते चार दिवसांपासून छत्तीसगड-महाराष्ट्र सीमावर्ती क्षेत्रातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला असून कोरची तालुक्यातील टिपागड परिसर ते धानोरा तालुक्यातील येरकड, मालेवाडा क्षेत्रात ते भ्रमंती करीत आहेत. त्यामुळे आतापर्यंत मानव-वन्यजीव संघर्षात वाघ, बिबट्याचा धुमाकुळाने त्रस्त असलेल्या वनविभागाला या नव्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.

अचानक जिल्ह्यात प्रवेश केलेल्या वन्य हत्तींच्या कळपाच्या संपूर्ण हालचालीवर वनविभाग लक्ष ठेवून असून नागरिकांनी या हत्तींना कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर हे छत्तीसगडमधील दुर्ग येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी संपर्कात असून हत्तींच्या या कळपाला नैसर्गिक मार्ग देऊन जिल्ह्याच्या बाहेर कसे जातील, या संदर्भात रणनीती आखली जात आहे.

विशेष म्हणजे मागील वर्षभरापासून गडचिरोलीत वाघ आणि बिबट यांचा धुमाकूळ सुरू असून वन्य हत्तींच्या कळपाच्या अचानक आगमनाने वनविभागासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. उत्तर गडचिरोलीतील कमलापूर येथील राज्यातील एकमात्र हत्तीकॅम्प वगळता कुठेही हत्तींचे वास्तव्य नाही. शिवाय कमलापूर येथील हत्ती पाळीव आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगड आणि पलीकडच्या ओरिसा राज्यात मोठ्या प्रमाणावर हत्तींचे कळप आढळून येतात. प्राप्त माहितीनुसार हत्तीचा हा कळप मागील वर्षी ओरिसातून मध्य प्रदेशात आला.

या कळपाने मध्य प्रदेशात दोन माणसांचे जीव घेतले. मागील वर्षीसुद्धा हा कळप गडचिरोलीच्या कोरची भागात काही काळासाठी येऊन गेला. तिथे एक वनकर्मचारी हत्तीच्या हल्ल्यात जखमी झाला होता. मागील महिन्यातही पाच ते सहा दिवस टिपागड क्षेत्रात या कळपाचे आवागमन सुरू होते. भटकंती करताना त्या हत्तींनी काही शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाचे नुकसान केले. हत्तीचा हा कळप पाहून स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्तींच्या कळपावर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी सक्रीय झाले आहेत.

वनविभागाचे आवाहन

गडचिरोलीत आलेले हत्ती हे वन्य हत्ती असून त्यांच्या कळपात छोटी पिल्लंसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांना माणूस अथवा पाळीव प्राण्यांकडून थोडाही त्रास झाला तरी ते हिंसक होऊन आक्रमण करण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हत्ती विचलित होतील अशी कोणतीही कृती करू नये किंवा हौस म्हणून हत्ती बघायला जाऊ नये, असे आवाहन वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी केले आहे.

असा आला कळप

जवळजवळ २० ते २२ हत्ती व पिल्लांचा या कळपात समावेश आहे. मागील ३-४ दिवसांपूर्वी छत्तीसगडमधून कोरची तालुक्यातील टिपागड परिसरात हा कळप दाखल झाला आणि तिथून मार्गक्रमण करीत मंगळवारी (ता. १९) तो मालेवाडा परिसरात आढळला. बुधवारी (ता. २०) हा कळप धानोरा तालुक्यातील येरकड व कन्हाळटोला, जपतलाई, जुडीयाल या भागात आढळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.