गडचिरोली : कोरोनामुळे (Corona) पालक गमविलेल्या लहान मुलांची सध्या बेकायदेशीररीत्या परस्पर दत्तक (Adoption of Orphan Children) घेणे व विक्री करणे सुरू आहे. हा प्रकार नुकताच समोर आला आहे. समाजमाध्यमावर (Social Media) संदेश, फेसबुक (Facebook) व व्हॉट्सऍपवर (WhatsApp) चुकीचे मॅसेजेस येत आहे. त्यावर लहान मुलांना दत्तक देणे आहे, असा मजकूर असतो. म्हणून अशा घटनांना रोखण्यासाठी त्याची माहिती मिळाल्यास 1098 तसेच स्टेट ऍडॉप्शन रिसोर्स एजन्सी (Adoption Resource agency) 8308992222, 7400015518 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे महिला व बालविकास आयुक्तालयाने कळविले आहे. (Orphan Children are directly adopted by people without doing documentation)
समाजसंकटांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून त्यावर कायद्यानुसार कठोर कार्यवाही केली जाईल, असेही या विभागाने कळविले आहे. कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांसोबतच बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या बालकाचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह, बालकामगार, भिक्षेकरी यासारख्या समस्यांसोबतच कोविड - 19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे.
अशा बालकाचा काही वेळा आप्तस्वकीयांकडून स्वीकार न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिक भर पडत आहे. बालकांचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असून काही समाजकंटक या समस्येचा वापर संधी म्हणून करून घेत परस्पर मुलांची विक्री करत असल्याचे चित्र समाजमाध्यमांवरील पोस्टवरून दिसून येत आहे. परंतु अशा प्रकारे बालकांना परस्पर दत्तक घेणे-देणे व खरेदी -विक्री करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 तसेच दत्तक नियमावली 2017 नुसार कठोर कार्यवाहीस पात्र आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बालकल्याण समिती व पोलिस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून या बालकांना ताब्यात घ्यावे. त्यांची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल.
ज्या पालकांना बालक दत्तक घ्यायचे आहे, अशा पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या आधारे पालक दत्तक घेण्यासाठी अर्ज नोंदणी करू शकतात, असेही महिला व बालविकास विभागाने कळविले आहे. सध्या समाजमाध्यमांवर काही मॅसेजेस सतत व्हायरल होत आहेत. यात एखादा मुलगा किंवा मुलगी यांनी त्यांचे पालक गमावले आहे. त्यामुळे त्यांना लवकर दत्तक द्यायचे आहे. गरजूंनी संपर्क साधावा, अशा आशयाचा मजकूर असतो. मुलेबाळे नसलेली अनेक दाम्पत्ये अशा संदेशांना भुलून संपर्क साधतात.
त्यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकते. शिवाय त्यांना दत्तकविधान कायद्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे भावनेच्या आवेगात त्यांनी परस्पर असे अनाथ बालक दत्तक घेतले, तर ते कायद्याच्या कचाट्यातही अडकू शकतात. त्यामुळे अशा मॅसेजेसना बळी पडू नये, संबंधित विभागाला दिलेल्या क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी व अनाथ बालकांचे भवितव्य सुरक्षित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रॅकेट असण्याची शक्यता...
मागील काही दिवसांत ज्या पद्धतीने व प्रचंड वेगाने समाजमाध्यमांवर अनाथ मुले दत्तक देण्यासंदर्भात जे मॅसेजेस फिरत आहेत. त्यामुळे या मागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा फटका ग्रामीण भागांतील तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील अनाथ बालकांना बसू शकतो. म्हणून पोलिस विभागाच्या सायबर क्राईम शाखेने अशा मॅसेजेसचे स्त्रोत शोधून या रॅकेटचा भंडाफोड करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
(Orphan Children are directly adopted by people without doing documentation)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.