यवतमाळ : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. सूचनांचे काटेकोर पालन आणि चाचण्यांसाठी नागरिक समोर आले नाही तर प्रशासनाला लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही. स्थिती आटोक्यात न आल्यास जिल्ह्यात २६ फेब्रुवारीपासून किमान दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात येईल, असे वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते. नमुने तपासणी आणि चाचण्यांसाठी नागरिक समोर आले नाही तर त्याचा परिणाम जिल्ह्यावर होईल, असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले, येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासन लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार आहे. यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, केळापूर तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त नमुन्यांची तपासणी करावी. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा गांभीर्याने शोध घेण्याचे निर्देश दिले.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा गांभीर्याने शोध घ्या. नमुने तपासणी आणि चाचण्या यांचे रोजचे उद्दिष्ट पूर्ण झालेच पाहिजे. रुग्णाच्या संपर्कातील कोणीही सुटता कामा नये. एका पॉझिटिव्ह व्यक्तिमागे किमान २० जणांची नमुने घेणे आवश्यक असून, ते त्वरित चाचण्यांसाठी पाठवा. याबाबत दोन्ही कार्यालयांनी आपल्या अखत्यारीतीतील खालच्या यंत्रणेला स्पष्ट निर्देश द्यावे. अन्यथा संबंधितांनाच जबाबदार ठरविण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.
जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी समन्वयातून काम करावे. केवळ कारणे सांगून होणार नाही. आहे त्या परिस्थितीत आणि उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून चाचणीबाबत गांभीर्य राखा. जिल्ह्यात २८,७९७ जणांचे लसीकरण २० फेब्रुवारीपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही नोंदणी केलेल्या ४० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले नाही. यात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा जास्त वाटा आहे. पोलिस आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची लसीकरणाची टक्केवारी चांगली आहे.
जिल्ह्यात औषधांची कमतरता भासणार नाही, याची आतापासूच दक्षता घ्या. कोव्हिड केअर सेंटरमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर रुग्ण तेथे भरती राहील. गृह विलगीकरणाची सुविधा दिली तर संबंधित रुग्ण नियमांचे पालन करीत नाही, असेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता केवळ अत्यावश्यक रुग्णांनाच गृह विलगीकरणाची सुविधा द्या. उर्वरित सर्वांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती ठेवा, असेही निर्देश त्यांनी दिले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यामध्ये मुंबईनंतर यवतमाळ राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच खाजगी रुग्णालयातील मृत्यूबाबत तीन सदस्यीय समितीचे गठण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.