Caste Certificate : तुही जात कंची; अठरा विश्व दारिद्र्यात जगणाऱ्यांना मिळाले जात प्रमाणपत्र

पारधी समाजबांधवांना प्रयत्नांनंतर मिळाला दिलासा! पारधी बेड्यावरील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण.
Caste Certificate for pardhi Society
Caste Certificate for pardhi Societysakal
Updated on

भिवापूर - वेशीच्या बाहेर बेड्यावर राहणाऱ्या पारधीबांधवांच्या कित्येक पिढ्यांना तुही यत्ता कंची, या प्रश्नाबरोबर तुही जात कंची, याही प्रश्नाला सामोरे जावे लागले. हे वास्तव स्वीकारुन त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहिली. अठरा विश्व दारिद्र्यात जगणाऱ्यांना त्यांच्या जातीची शासकीय ओळख न मिळाल्याने सम्मानाचे जगणे तर दूर कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ घेता आला नाही.

जात प्रमाणपत्राअभावी गरडापार येथील पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागले. त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागला. मात्र इतक्या वर्षांनंतर त्यांच्या बेड्यावर जाऊन जातप्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याने शिक्षण घेत असलेली मुले व त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला.

पंचायत समिती सदस्य कृष्णा घोडेस्वार यांनी त्यांची ही अडचण दूर केली. त्यांच्या प्रयत्नाने मंगळवारी (ता.६) २५ विद्यार्थ्यांना एकाच वेळी जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यासह संपूर्ण गरडापार गावात आनंदाचे वातावरण पसरले.

तालुक्याच्या पश्चिमेला शेवटच्या टोकावर असलेले गरडापार गाव पारधी बेडा म्हणूनही ओळखले जाते. निसर्गरम्य वातावरनाने वेढलेल्या टेकडीवर सुमारे ७० ते ८० घरांची वस्ती असलेल्या या गावाची लोकसंख्या २५० ते ३००च्या घरात आहे. मुख्यतः शिकार करणे व इतर अपारंपरिक धंदे करणे, हा पारधी समजाचा व्यवसाय समजला जातो.

विकासाच्या मुख्य प्रवाहापासून हा समाज आजही कोसो दूर आहे. गावाला भेट दिल्यानंतर ते समजून येते. या समजातील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आनण्यासाठी शासनाकडून अनेक उपक्रम, योजना राबविल्या जात आहेत. परंतु त्यांचा लाभ घेण्यासाठी हा समाज कागदपत्राची पूर्तता करू शकत नाही.

पर्यायाने योजना असूनही त्यांचा लाभ या समाजाला मिळत नाही. कागदपत्रात मुख्य अडचण ही जात प्रमाणपत्राची होती. ते मिळावे यासाठी समाजातील शिक्षित मंडळींनी शासनाशी संघर्ष केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अनुसूचित जमातीचे (st) जात प्रमाणपत्र या समाजाला मिळू लागले. मात्र ते सहजासहजी न मिळता त्यासाठीही खस्ता खाव्या लागत आहेत.

...आणि ओसंडून वाहला चेहऱ्यावरुन आनंद

गरडापार येथील विद्यार्थ्यांची ही अडचण समजून घेत पंचायत समिती सदस्य असलेल्या कृष्णा घोडेस्वार यांनी गावकऱ्यांशी चर्चा करुन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालविले. उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी विषय गांभीर्याने घेत तातडीने कार्यवाही करून एकूण २५ विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र तयार केले.

मंगळवारी (ता.६) कृष्णा घोडेस्वार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी रवी मालवंडे, लक्ष्मीकांत नागरेकर, हिरामण भोयर, मानोऱ्याचे सरपंच तिवाडे, विनोद पवार, गुणवंत सोळंकी, मंडळ अधिकारी वाघ व गरडापार येथील गावकरी उपस्थित होते. जात प्रमाणपत्र मिळाल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वहात होता. सर्वांनी घोडेस्वार यांचे आभार मानलेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.