भामरागड (जि. गडचिरोली) : पावसाळ्यात दरवर्षी पर्लकोटा नदीला महापूर येतो. या नदीवरील जुना, अरुंद व ठेंगणा पूल आठ-आठ दिवस पाण्याखाली राहतो. पुराचे पाणी पुलाच्या वर तब्बल १२ ते १५ फुटांपर्यंत असते. येथून हाकेच्या अंतरावर तीन नद्यांचा संगम आहे. त्यामुळे इंद्रावती व पामुलगौतम नद्यांचे पाणी पर्लकोटा नदीच्या प्रवाहाला अडवते आणि पुराचे पाणी मुख्य बाजारपेठेत शिरते. त्यामुळे वाहतूक आणि जनजीवन सारेच ठप्प होते. पावसाळ्याच्या दिवसांत भामरागडचा गडचिरोली जिल्ह्यातील बऱ्याच गावांशी संपर्क तुटतो. कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पुलाचे काम अखेर सुरू झाले; परंतु मोठ्या पुलाच्या निर्माणात संपूर्ण बाजारपेठ आणि तेथील घरे भूईसपाट होणार आहेत. (Pearlkota-River-Rainy-Days-Bhamragad-Gadchiroli-District-nad86)
दोन हातांच्या भरोशावर दिवस-रात्र मेहनत करून झोपड्यांतील व्यापारी हक्काच्या घरात गेले. घरटॅक्स नियमित भरत असल्याने नळ, वीज अशा सर्वच सुविधा त्यांना आहेत. परंतु हक्काचा निवारा आणि व्यवसाय दोन्ही जाणार असल्याने रहिवासी प्रचंड तणावात आहेत. पर्लकोटा नदीवरील पूल अतिशय गरजेचा आहे. तो झालाच पाहिजे. परंतु आमच्या हक्काचा निवारा आणि रोजगार जाऊ नये. सरकारने सारे करावे; परंतु आमच्या पोटावर लाथ मारू नये, आमच्या घरांचे आणि व्यवसायाचे पुनर्वसन करावे, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.
लोकबिरादरी प्रकल्पापासून तीन किलोमीटर अंतरावरील भामरागडलगतच्या त्रिवेणी संगमावर पोहोचलो. येथील इंद्रावती, पर्लकोटा व पामुलगौतम या तिन्ही नद्यांचा संगम पाहिला. संगमाजवळ १९६४ साली केवळ लाकडापासून तयार केलेल्या विश्रामगृहात आराम केला. पर्लकोटा नदीवरील उंच पुलाचे बांधकाम पाहताना त्रिवेणी व्यापारी संघटनेच्या स्थानिकांनी आपली व्यथा मांडली. २१ आॅगस्ट २००६ रोजी पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील स्वतः भामरागडला आले. त्यांनी तेव्हाच नवीन उंच पूल बांधण्याचा निर्णय घेतला. पुलाची प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढण्यात आली. मात्र, अतिसंवेदनशील भाग असल्याने कोणताही कंत्राटदार काम करण्यासाठी तयार नव्हता. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २०२० साली कंत्राटदार मिळाला व नऊ महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
आंदोलनातून व्यापाऱ्यांनी वेधले लक्ष
नवीन पुलाचे आतापर्यंत १६ स्तंभ उभारले आहेत. सदर पूल मुख्य बाजारपेठेतून जाणार असल्याने अनेक घरे व दुकाने भूईसपाट होणार आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई द्यावी व पुनर्वसन करून हक्काची जागा मिळावी यासाठी व्यापाऱ्यांनी २८ जूनला आंदोलन केले. यावेळी बाजारपेठेत १०० टक्के बंद पाळण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंसाठी जनतेचे हाल झाले. व्यावसायिकांनी पुनर्वसनासाठी शासन-प्रशासनाला अनेकदा अर्ज-विनंत्या केल्या; मात्र सरकारला पाझर फुटला नाही. गेल्या काही महिन्यांपासून पुलाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. पावसाळ्यानंतर येथील घरांवर बुलडोझर चालून अनेकांचे संसार उद्धवस्त होणार आहेत. व्यावसायिकांची बाजारपेठ जमीनदोस्त होणार असल्याने सारेच हवालदिल आहेत.
घर, व्यवसायाचे पुनर्वसन हा आमचा हक्क
सरकार आमची आर्त हाक नक्कीच ऐकेल व आम्हाला हक्काची जागा मिळेल याच आशेवर नागरिक आहेत. पूल बांधकामाला व्यापाऱ्यांचा मुळीच विरोध नाही. पूल व्हावा हीच व्यापाऱ्यांसह जनतेचीही मागणी आहे. मात्र, व्यापाऱ्यांना हक्काची जागा देऊन पुनर्वसन करावे, एवढीच त्यांची मागणी आहे. १५ आॅगस्ट १९९२ रोजी भामरागड तालुका निर्माण झाला. त्यापूर्वी व नंतरही रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांनी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुल्या जागेत छोटी-छोटी दुकान थाटली. झोपड्या बांधून राहायला लागले. पुढे झोपडीचे रूपांतर पक्क्या घरात झाले. काहींनी दोन मजली इमारती उभ्या केल्या. त्यावेळी शासन-प्रशासनाने हरकत घेतली नाही. गेल्या २५-३० वर्षांपासून येथील निवासी घराचा कर भरतात. रहिवासी झाल्याने वीजजोडणी मिळाली. मतदान ओळखपत्र, आधारकार्ड याच ठिकाणच्या आधारे मिळाले. हा जागा पुलासाठी जाणार असल्याने व्यवसाय आणि घरांचे पुनर्वसन होणे हा आमचा हक्क आहे. तो मिळाचा पाहिजे, अशी मागणी व्यावसायिकांनी केली.
(Pearlkota-River-Rainy-Days-Bhamragad-Gadchiroli-District-nad86)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.