नागपूर ः ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती आजही फारशी बरी नाही. उपचाराच्या छोट्या छोट्या साहित्याअभावी किंवा उपचारांना होणाऱ्या विलंबामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यातल्या त्यात गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तर रुग्णांना उपचारासाठी धडपडावे लागते. हीच परिस्थिती बदलण्यासाठी डॉक्टर होऊन गावात दवाखाना सुरू करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने आपले कार्यक्षेत्र निवडले. वाट बिकट होती परंतु मागे वळून पहायचे नाही, हे ठरवून तो मार्गक्रमण करीत राहिला. जिद्द आणि चिकाटीने आपल्या कार्यात यशस्वी ठरला. फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांसाठी देवदूत ठरलेल्या त्या तरुणाचे नाव आहे डाॅ. सूरज मस्के.
गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याचे असंख्य प्रश्न आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा द्यायची, त्यासाठीच्या कौशल्य विकासाची पहिली पायरी म्हणून इंटर्नशीप पूर्ण झाल्यावर ‘सर्च’ संस्थेत आदिवासी भागात चालणाऱ्या फिरत्या वैद्यकीय पथकाचा आरोग्य अधिकारी म्हणून काम करण्यास डाॅ. सूरजने सुरुवात केली. आदिवासी आरोग्य विभागात चालणारा फिरता दवाखाना ‘राष्ट्रीय आरोग्य मिशन’ महाराष्ट्र शासन व ‘सर्च’ यांच्या संयुक्तरीतीने चालणारा कार्यक्रम आहे. आरोग्य पथकाच्या टीममध्ये आरोग्य अधिकाऱ्यासह औषधी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दोन आरोग्यसेविका आणि दोन वाहनचालक अशी सात जणांची टीम आहे.
हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम
गडचिरोलीला मलेरिया मोठ्या प्रमाणात होतो. साधारणतः ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मलेरियाच्या केसेस भरपूर प्रमाणात आदिवासी गावांमधून येतात. लोकांना समजावलं तर कळतं, त्यांना समजावणारा पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत जनजागृती गरजेची आहे. अत्यंत मायाळू, प्रेमळ, अदबशीर, शांत वृत्तीची, कलात्मकता असलेली, सांघिक भावना टिपणारी, मोकळ्या वृत्तीची माणसं येथे आहेत. सर्च आणि ही माणसं दोघेही एकमेकांकडे समत्व दृष्टीने पाहतात, ही यातली खासियत. याचाच फायदा घेऊन डाॅ. सूरज मस्के यांनी आपले कार्य सुरू केले.
लहान मुले, स्त्रिया, म्हाताऱ्या बाया या पुरुषांप्रमाणे अति तंबाखू सेवन करतात. कुणाचेही दात पाहिले तर लाल, काळेच अधिक दिसतील. अशा लोकांना जनजागृतीची गरज असते. हेच काम डाॅ. सूरज आणि त्यांची चमू करीत आहे. चंद्रपूर जिल्हा मागास नाही, असे आपल्याला वरकरणी वाटते, परंतु येथील ग्रामीण भागातील आरोग्याची स्थिती अतिशय वाईट आहे. डाॅ. सूरज आणि त्यांची चमू सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील अंतरगाव आरोग्यवर्धिनी केंद्रात सेवा देत आहेत. सुरुवातीला येथील आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव होता. प्रदूषणाचा प्रश्न मोठा. प्रदूषणाच्या मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून त्यासाठी काम करण्याच्या विचाराने त्यासाठी लागणारे कौशल्य ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न डॉ. सूरज यांनी सुरू केला.
ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची पुरती वाट लागली असल्याचे वास्तव लक्षात येण्यास त्यांना वेळ लागला नाही. मग ती व्यवस्था बदलण्याच्या दिशेने डॉं. सूरज यांनी प्रयत्न सुरू केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी वाढविण्यापासून तर रुग्णांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी डॉ. सूरज यांनी स्वतः प्रशासनाशी लढा दिला. आज चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील अंतरगाव आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत २४,०८९ नागरिकांचे आरोग्य सांभाळले जाते. नागरिकांना मूलभूत सुविधांपासून सर्वकाही वेळच्या वेळी पुरविण्याकडे डाॅ. सूरज यांचे विशेष लक्ष असते.
आरोग्यव्यवस्था बदलणे खरे आव्हान
ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणे कठीण काम आहे. परंतु डॉक्टरची खरी गरज ग्रामीण भागात आहे. गडचिरोली आणि आता चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम करताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था बदलणे खरे आव्हान आहे. तेव्हा निदान तरुणांनी ग्रामीण भागात सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. कारण त्यांची खरी गरज तिथे आहे.
डॉ. सूरज मस्के, डाॅ. प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतरगाव, ता. सावली, जि. चंद्रपूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.