सिरोंचा (जि. गडचिरोली) : श्रावण महिना म्हणजे सर्वत्र देवाची भक्ती, शिवपूजा, प्रत्येक मंदिरात गर्दी आणि मंगलमय वातावरण. श्रावणात शिवपूजनाचे खास महत्व आहे. या या काळात अनेक प्राचीन शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात. गडचिरोली जिल्ह्यातही अनेक प्रसिद्ध शिवमंदिरे आहेत. मात्र यात एक प्राचीन मंदिर आहे ज्या मंदिरात महादेवासोबत यमाचीही पूजा केली जाते.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वांत प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर सिरोंचा तालुक्यात आहे. गोदावरी, प्राणहिता व अंतरवाहिनी सरस्वती नदीच्या संगमावर वसलेले कालेश्वर-मुक्तेश्वर मंदिर आहे. या मंदिरात महादेवासोबत यमाची पूजा होण्यामागे एक आख्यायिका आहे. ज्यामुळे या मंदिराचे महत्व काशीच्या मंदिरापेक्षा अधिक आहे.
गोदावरी नदीचा शेवटचा प्रवास सिरोंचापासून सहा किलोमीटर अंतरावरील नगरम आणि चितलपल्ली गावाजवळ होतो. या नदीच्या पलीकडे कालेश्वर-मुक्तेश्वराचे जवळपास आठशे वर्षांहून अधिक पुरातन मंदिर आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले असून या ठिकाणी गोदावरी, प्राणहिता आणि आंतरवाहिनी सरस्वती अशा तीन नद्यांचा संगम आहे. त्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पूर्वी कालेश्वरला जायचे असल्यास नगरम येथून नाव किंवा गोलाकार डोंग्यातून गोदावरी नदी पार जावे लागायचे. आता गोदावरी नदीवर मोठा पूल झाल्यामुळे आता थेट वाहनाने भेट देता येते. यंदा कोरोनामुळे भक्तांची गर्दी नसली, तरी या मंदिरातील धार्मिक विधी नियमित सुरू आहेत.
इसवी सन 1140 ते 1170 दरम्यान काकतियाचे राजा वीरभद्र यांनी या मंदिराची निर्मिती केली होती. गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर येथे असून दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या तीरावर कुंभमेळा भरतो. त्याच वेळेला कालेश्वर येथे प्रतिकुंभमेळा भरतो. याला पुष्करपर्व असे म्हटले जाते. या क्षेत्राला आता पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
या मंदिरात शंकर आणि यम धर्मराज या दोघांच्या पिंडी आहेत. देशातील प्रत्येक शिव मंदिरात एकच शिवलिंग असते. पण, कालेश्वर-मुक्तेश्वर, असे एकमेव मंदिर आहे जिथे दोन शिवलिंग आहेत. जगात शिवासोबत कुठेही यमाची पूजा होत नाही. मात्र कालेश्वर मंदिरात कालेश्वर म्हणजे यम आणि मुक्तेश्वर म्हणजे शिव या दोघांची एकत्रित पूजा केली जाते. त्यामुळे काशीपेक्षा या मंदिराचे महत्त्व अधिक असल्याचे म्हटले जाते.
कालेश्वर गावात या मुख्य मंदिरासोबत सरस्वती देवीचे मोठे मंदिर आहे. देशात सरस्वतीचे तीन मोठे मुख्य मंदिर आहेत. त्यात कालेश्वर येथील प्रौढ सरस्वती मंदिराचा समावेश आहे. कालेश्वर गावात गणपती, दत्त, श्रीरामचंद्र आणि इतर विविध देवी-देवतांचे इतर दहा मंदिरे आहेत.
पुराणात या मंदिराबद्दलच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यातील एका कथेनुसार ऋषी मार्कंडेयाने दीर्घायुषी होण्यासाठी वैनंगंगेच्या काठावर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या आरंभिली होती. त्यांचे आयुष्य केवळ 14 वर्षे असल्याने नियमानुसार यमराज प्राण घ्यायला आला. पण, शंकराने प्रसन्न होऊन यमाला पराभूत करत मार्कंडेय ऋषीला 1400 वर्षांच्या आयुष्याचे वरदान दिले. तेव्हा यमाने माझी कोणीच पूजा करत नाही, असे सांगत शिवाकडून त्यांच्यासोबत आपल्या पूजेचे वरदान मागून घेतले.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.