सालेकसा (जि. गोंदिया) : सालेकसा वनपरिक्षेत्राअंतर्गत बिजेपार सहवनक्षेत्रातील कुलरभट्टी भाग - 1 या नियतक्षेत्रात मंगळवारी सायंकाळी कुलरभट्टी येथील काही नागरिकांना जंगलालगतच्या शेतात मांजरासारखा दिसणारा प्राणी आढळून आला. याची माहिती नागरिकांनी सालेकसा वनविभागाला दिली. या माहितीवरून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केल्यावर सर्वांनाच धक्का बसला.
पाहणीदरम्यान अंदाजे दोन ते तीन महिन्यचा बिबट्याचा शावक दिसून आला. वनविभागाने त्याची सुखरूप सुटका केली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. हा शावक मंगळवारी (ता. 14) सायंकाळच्या सुमारास आढळला होता. त्यानंतर तपासणी केली असता, या शावकाच्या शरीरावर कुठलीही जखम अथवा इजा आढळून आली नाही. दरम्यान, या शावकाला गावकऱ्यांच्या मदतीने गावालगत असलेल्या जंगलात त्याच्या आईच्या जवळ सोडण्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठरवले.
त्यानंतर, गावालगत बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात बांबूपासून तयार केलेल्या पिंजऱ्यात शावकाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. तथापि, दोन-तीन तासांच्या प्रयत्नानंतर पहाटे 1 च्या सुमारास मादा बिबट आली आणि तिने शावकाला उचलून नेले. त्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. ही कार्यवाही वनपरिक्षेत्राधिकारी अभिजित इलमकर यांच्या नेतृत्वात वनरक्षक बघेले, बोरकर, पटले व अन्य कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने केली.
जंगलव्याप्त भागांत गस्त वाढविणे गरजेचे
सालेकसा तालुक्यातील बहुतांश गावे ही जंगलव्याप्त भागांत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागून आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा गावात व शेतात वावर वाढला आहे. अशावेळी शिकाऱ्यांची टोळी सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.