- अर्चना फाटे
मोताळा - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना स्वतःचे हक्काचे छत असावे, घरामध्ये वीज असावी, गॅस कनेक्शन असावे व नळ कनेक्शन इत्यादी सुविधा मिळाव्या, या उदात्त हेतूने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. यातून तालुक्यात पाच योजनेतून ५ हजार ३९० घरकुल पूर्ण झाले असून अनेकांना हक्काची घरे मिळाली आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेतून आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तालुक्याला २ हजार ४१७ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी संपूर्ण उद्दिष्टाला मंजुरी देण्यात आलेली आहे. २ हजार १७२ घरकुल पूर्ण झाले असून यातील २०६ घरकुल अपूर्ण आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेची टक्केवारी पाहता ८९.८६ टक्के एवढी आहे.
नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचवावे व त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये रमाई घरकुल योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यामध्ये २ हजार ६३८ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी सर्वच घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. २ हजार १४६ घरकुले पूर्ण झाले तर ४९२ घरकुल अपूर्ण आहेत. तालुक्यातील या योजनेची यशस्विता ८१.३५ टक्के एवढी आहे.
शहरी व ग्रामीण भागातील आदिवासींच्या घरकुलासाठी शासनाने शबरी आवास घरकुल योजनेची सुरवात केली आहे. या योजनेअंतर्गत मोताळा तालुक्यात १५७ घरकुलांचे उद्दिष्ट होते, पैकी ७७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. ५८ घरकुले पूर्ण झाली असून ९९ घरकुले अपूर्ण आहेत. या योजनेची ७५.३२ टक्केवारी आहे.
धनगर समाजासाठी धनगर आवास योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत तालुक्यामध्ये २५ घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या सर्व २५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून यापैकी तीन घरकुले पूर्ण झाली आहेत. २१ अपूर्ण आहेत. या योजनेची टक्केवारी १२ एवढी आहे.
मोदी आवास योजनेतील १ हजार ११६ घरकुले अपूर्ण
ग्रामीण भागातील इतर मागासवर्गीयांना हक्काची घरे असावी, यासाठी मोदी आवास योजनेची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या योजनेत विशेष मागास प्रवर्गांनाही घरे देण्यात येणार आहेत. मोदी आवास योजनेअंतर्गत मोताळा तालुक्यात १ हजार २३७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पैकी सर्वच्या सर्व उद्दिष्टाला मंजुरी देण्यात आली. ७४ घरकुले पूर्ण झाली आहेत तर १ हजार ११६ घरकुले अपूर्ण आहेत. याची टक्केवारी ५.९८ एवढी आहे.
आवास योजनेची ६९ टक्के उद्दिष्टपुर्ती
या पाचही आवास योजनेचा आढावा घेतला असता तालुक्याला ६ हजार ४७४ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ६ हजार ३९४ ला मंजुरी देण्यात आली आहे. ४ हजार ४५३ घरकुले पूर्ण झाली असून १ हजार ९३४ घरकुले अपूर्ण आहेत. याची टक्केवारी बघता ६९.६४ एवढी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.