वाशीम : प्राचीन अवशेष राष्ट्रीय धरोहर मानल्या जातात. त्यातून तत्कालीन समाजव्यवस्था आणि इतर आवश्यक माहिती मिळून अभ्यासकांना संशोधनाकरिता नवे दालन उपलब्ध होते. वाशीमच्या विविध भागात ऐतिहासिक दाखल्यांवरून पुरातत्त्व विभागातर्फे उत्खनन करण्यात आले. परंतु उत्खनन झालेल्या ठिकाणी महत्वपूर्ण पुरातन अवशेष, वस्तू आढळून आल्यानंतरही तोकडा निधी आणि राजकीय उदासिनतेमुळे उत्खनन अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे.
प्राचीन काळापासून एक पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध
वाशीममधील व्यंकटेश चित्रपटगृहाच्या मागील परिसरात व्याघ्रेश्वर टेकडीजवळ महाराष्ट्र शासनाच्या नागपूर पुरातत्त्व विभागाच्या वतीने टेलीफोन टॉवरची उभारणी सुरू असताना 19 नोव्हेंबर 2005 रोजी चाचणी उत्खननास करण्यात आले होते. या परिसरात पुरातन अवशेष, व्याघ्रेश्वर मंदिर, तीर्थ किंवा एखाद्या महालसदृष प्रचंड तटबंदीची वास्तू आहे, याबाबत शहरवासीयांची उत्सुकता शिगेला पोचली होती. वत्सगुल्म (वाशीम) हे प्राचीन काळापासून एक पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले आणि वाकाटक नृपतीच्या राजधानीचे नगर म्हणून ख्यातीप्राप्त आहे. येथील परिसरात आजही पुरातन अवशेषाच्या खाणाखुणा आढळून येतात. क्षेत्र महात्म्यविषयक इतिहासतज्ज्ञ, अभ्यासक य. खु. देशपांडे यांच्या ‘वत्सगुल्म महात्म्य’ या ग्रंथात येथील व्याघ्रेश्वर टेकडी परिसरात (रघूविरसिंग मिरथसिंग यांचे शेत क्र. 339/पो.ही.4 मध्ये) पुरातन काळी व्याघ्रेश्वर म्हणजे भगवान महादेवाचे भव्य देवालय आणि व्याघ्रेश्वर तीर्थ विद्यमान होते, असे नमूद करण्यात आले आहे.
क्लिक करा - कोरोनाची धडकी; कार्यक्रमाला कात्री
शासनाचे वेळकाढू धोरण
या टेकडी परिसरात नागपूर पुरातत्त्व विभागाचे संचालक र. ना. हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक संचालक बाजीराव गजभिए यांच्या नियंत्रणाखाली तंत्रसहायक आनंद भोयर, छायाचित्रकार देवेंद्र बोकडे यांनी पुरातत्त्व शास्त्राचे निकष वापरून 19 नोव्हेंबर 2005 रोजी चाचणी उत्खनन केले होते. यामध्ये सातवाहन ते वाकाटककालीन अवशेष प्राप्त झाले. उत्खननाच्यावेळी 20 मीटर भिंतीचा मोकळा भाग आढळला असून या भिंतीची रुंदी 1.25 मीटर एवढी आहे. भिंतीचे कमीत कमी तीन थर, तर जास्तीत जास्त 11 थर असून ही भिंत उत्तर-दक्षिण अशी गेली आहे. भिंतीचा पूर्वेकडील भाग सुस्थितीत आहे; तर पश्चिमेकडील भाग बऱ्याच ठिकाणी खंडित झाल्याचे आढळून आले होते. याठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननात भिंतीच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या पांढऱ्या मातीसोबत मृद भांडीही आढळून आली. असे महत्त्वपूर्ण अवशेष सापडूनही शासनाच्या वेळकाढू धोरणांमुळे याठिकाणी केवळ चाचणी घेऊन उत्खनन बंद करण्यात आले आहे.
केंद्राकडे अहवाल धुळखात पडून
याबाबतचा अहवाल पुरातत्त्व विभाग (नागपूर) यांनी केंद्र शासनाकडे अधिक निधी उपलब्ध होण्यासाठी पाठविला आहे. मात्र, केंद्र शासनाने यावर अद्यापही कोणतीच कारवाई केली नाही. व्याघ्रेश्वर टेकडी परिसरात नेमके काय दडलेले आहे? याची उत्सुकता वाशीम जिल्ह्यातील नागरिकांना आहे. बंद केलेले उत्खनन त्वरित सुरू करून भूगर्भात दडलेले रहस्य उलगडण्यात यावे, अशी इतिहासतज्ज्ञांसह परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
विकास कामांना बंदी करण्याची गरज
व्याघ्रेश्वर टेकडी परिसरात चाचणी उत्खनन झाल्यानंतर पुरातत्वविभाग नागपूर यांनी शेत क्र. 339 या सर्व्हेनंबरसह परिसरातील आणखी दोन सर्व्हेनंबर बॅन करण्यात आले होते. या परिसरात कोणत्याही विकास कामांना परवानगी देऊ नये, असे पत्र नगर पालिका व जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र, सध्या या परिसरात मोठ-मोठी विकास कामे होताना दिसून येत आहे. याला नगर पालिका प्रशासनाने परवानगी दिली कशी? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
राजकीय नेत्यांनी घ्यावा पुढाकार
व्याघ्रेश्वर टेकडी परिसरात उत्खननासाठी वाढीव निधीची गरज आहे. यासाठी राजकीय नेत्यांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. वाशीम हे पौराणीक व ऐतिहासीक वारसा असलेले शहर आहे. त्यामुळे या शहराचा पौराणिक वारसा उजेडात येण्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
-दिलीप जोशी, इतिहास अभ्यासक, वाशीम
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.