लग्नाच्या स्वागतसमारंभाची तयारी सुरू होती अन्‌ अचानक...

wedding
wedding
Updated on

अमरावती : लग्नानंतर गावात छोटेखानी स्वागतसमारंभाची तयारी सुरू असतानाच नवरदेवाचा विद्युत शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. पाच) यावली शहीद या गावात घडली. विक्रम पंजाबराव मेटकर (वय 32, रा. यावली शहीद) असे या दुर्दैवी नवरदेवाचे नाव आहे. 

हॉलमध्ये जाण्यासाठी तो वाट बघत होता 

मंगळवारी, चार फेब्रुवारी रोजी नोंदणी पद्धतीने विक्रम मेटकर याचे लग्न झाले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी, पाच फेब्रुवारी रोजी लग्नाचा गावातच छोटेखानी स्वागतसमारंभ होता. त्यासाठी गावातील लोकांनाही आमंत्रित केले गेले. सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्वागतसमारंभाची वेळही ठरली होती. सकाळी नवरदेव-नवरीचा न्हाणोऱ्याचा कार्यक्रम आटोपला. अंघोळ आटोपल्यावर विक्रम स्वागतसमारंभासाठीचे नवीन कपडे घालून तयार झाला. नववधूची तयारी घरात सुरू होती. समारंभाच्या हॉलमध्ये जाण्यासाठी कार दारात येण्याची तो वाट बघत होता. 

अन्‌ काळाने संधी साधली...

नेमके याच वेळी घरातील कुणालातरी पाण्याची गरज भासली. त्यामुळे विक्रम विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेला. मोटारीचा वायर जमिनीवर लोंबकळत होता. त्याने तो वायर उचलला आणि पीनबोर्डवर खोचायला लागला. त्याचवेळी विक्रमला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. डॉक्‍टरांनी तपासणीअंती विक्रमला मृत घोषित केले. 

नववधूला अश्रूही आवरेना...

विक्रमसोबत नवीन आयुष्याला सुरुवात झाल्याने नववधू आनंदात होती. स्वागत समारंभासाठी तिने साज चढवला होता. परंतु हॉलमध्ये जाण्यापूर्वीच विक्रमला विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. काही क्षण नेमके काय झाले, हेच तिला कळेना. परंतु ज्यावेळी ती शुद्धीवर आली तेव्हा तिला अश्रू आवरेनासे झाले होते. विक्रमचे वडील शेतमजुरी करतात. विक्रमही बाहेरगावी राहून नोकरी करायचा. दीड महिन्यापूर्वीच त्याचे लग्न जुळले. दोन्ही कुटुंबीयांची आर्थिक परिस्थितीत बेताचीच असल्यामुळे लग्न साध्या पद्धतीने करण्यात आले होते, असे यावली येथील पोलिस पाटील मनीषा नागोने यांनी सांगितले. 

ग्रामस्थही सुन्न

स्वागतसमारंभ असल्याने विक्रमच्या कुटुंबीयांनी संपूर्ण गावाला या छोटेखानी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. परिस्थितीमुळे पत्रिकाही मोजक्‍याच छापल्या. परंतु अचानक घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थही सुन्न झाले. गावात अनेकांच्या घरी चुलीही पेटल्या नाहीत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.