स्ट्रगलर असल्याचे भासविले, लग्न करून गंडविले 

marriage
marriage
Updated on

यवतमाळ : आपण स्ट्रलगर आहोत. पोलिस भरतीची तयारी सुरू आहे. आयुष्यात खूब मोठे व्हायचे स्वप्न आहे. त्यासाठी मदत करण्यासाठी तरुणाला साकडे घातले. गोडीगुलाबीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ब्लॅकमेल करून नोंदणी पद्घतीने विवाहदेखील केला. मात्र, संसार फुलण्यापूर्वीच ती तरुणी घटस्फोटीत असल्याचे समोर आले. सर्व परिस्थिती समोर येताच तरुणाला धक्का बसला. या फसवणुकीची तक्रार तरुणाने यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.

सूरज नौकरकर (वय २७, रा. आसेगावदेवी, ता. बाभूळगाव) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो ग्रामीण भागात विविध शासकीय योजनेला लागणारे साहित्य पुरविण्याचे काम करतो. एक वर्षापूर्वी दीपाली नावाच्या मुलीशी त्याची ओळख झाली. हळूहळू तिने ओळख वाढविली. आपण स्ट्रगलर आहोत, असे सांगून विश्‍वास संपादित केला.

पैसेही उकळत दर्शनासाठी त्र्यंबकेश्‍वर नाशिक येथेही घेऊन गेली. लग्न करण्याची इच्छा तिने बोलून दाखविली. त्याला तरुणाने नकार दिला. मात्र, जनार्दन उर्फ पप्पू सेलकर याने लग्न न केल्यास बदनामी करण्याची धमकी तरुणाला दिली. कागदपत्रांची जुळवाजुळव करीत २३ जुलै रोजी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सूरज नौकरकर याने यवतमाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दीपाली व पप्पू सेलकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.


असे फुटले बिंग

विवाह होताच दोघेही नातेवाइकांकडे गेले. त्या ठिकाणी फोटो काढले. त्यानंतर तरुण पांढरकवडा येथे तर तरुणी आपल्या रूमवर निघून गेली. नातेवाइकाने त्यांचे फोटो इतरांना दाखविले असता, तिचे पूर्वीच लग्न झाले आहे. नऊ वर्षाची मुलगीही आहे, असे सांगितले. त्यानंतर तरुणाने सर्व कागदपत्रे गोळा केली. त्यात जन्मतारीख दुसरीच निघाली. घटस्फोट झाल्याचेही लपवून ठेवले. नोंदणी विवाह करताना बनावट कागदपत्रे सादर केली. अशाप्रकारे बिंग फुटले.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.