Success Story : आवड म्हणून सुरू केलेली शेतीच झाली करिअर; अभ्यासपूर्ण लागवडीतून मिळविले यश

Progress made in agriculture
Progress made in agriculture
Updated on

अमरावती : आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करणे फारच कमी लोकांच्या नशिबी येते. दैनंदिन जीवनात याचा अनुभव आपल्याला येत असतो. मात्र, आवड म्हणून सुरू केलेली शेतीच एखाद्याचे करिअर होऊ शकते, यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. मात्र, तिवसा तालुक्‍यातील कुऱ्हा येथील प्रयोगशील महिला शेतकरी सुवर्णा नितीन इखार यांनी हे साध्य करून दाखविले आहे. हे इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श उदाहरण आहे.

एम.ए.पर्यंत शिक्षण घेतलेल्या सुवर्णा इखार यांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती. मात्र, त्यांना त्यातील परिपूर्ण माहिती नव्हती. सामान्यपणे शेतकरी करतात तशी शेती त्यांच्या कुटुंबात होत होती. कालांतराने साडेदहा एकर शेती त्यांच्या वाट्याला आली. पती नितीन हे शेतकरीच असल्यामुळे पारंपरिक शेती करण्यावरच त्यांचा भर होता.

मात्र, पत्नी सुवर्णा इखार यांनी स्वतः काही तरी करायचे, असा ठाम निर्धार मनात बांधला. त्यानंतर त्यांनी इतर पिकांची माहिती घेण्यास सुरुवात केली. साडेदहा एकरांपैकी अर्ध्या भागात त्यांनी सुरुवातीला काकडीची लागवड प्रायोगिक तत्त्वावर केली.

विशेष म्हणजे त्यात त्यांना चांगलाच नफा मिळाला. पहिल्याच प्रयोगात काकडीपासून त्यांना ७० ते ८० हजार रुपयांचा नफा झाला. त्यामुळे सुवर्णा यांच्यातील आत्मविश्‍वास अधिकच बळकट झाला. आपणही या माध्यमातून पुढे प्रगती करू शकतो, असा दांडगा आत्मविश्‍वास त्यांच्यात निर्माण झाला.

यानंतर त्यांनी लागवडीचे तंत्रशुद्ध ज्ञान मिळवित कारले, टमाटर, काकडी, वांगे व फुलकोबीची लागवड केली. मात्र, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांचे पाच एकरातील टमाटर विकले गेले नाहीत. त्यामुळे त्यांना नुकसान सोसावे लागले. मात्र, तरीही न डगमगता त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. त्यानंतर काकडी, कारली, वांग्याचे पीक घेतले.

त्यांनी तयार केलेल्या पिकांना कुऱ्हासह शेंदूरजनाबाजार, तिवसा, मोझरी, चांदूररेल्वे इत्यादी ठिकाणची बाजारपेठ मिळाली. याठिकाणी दररोज त्यांचा माल जाऊ लागला आणि उत्पन्नाचे एक नवीन स्त्रोत निर्माण झाले. स्वतःची मेहनत, जिद्दीच्या जोरावर शेतीसारख्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या सुवर्णा इखार यांनी या क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे.

आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करा
सुरुवातीला शेतीचे कुठलेही ज्ञान नसताना आपण या क्षेत्रात आलो. महिलांनीही न डगमगता खंबीरपणे आपल्या शेतात अशाच प्रकारे प्रयोग करून आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करावा.
- सुवर्णा इखार,
प्रयोगशील शेतकरी, कुऱ्हा

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.