निलज बु. (जि. भंडारा) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतली जाणारी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाची पूर्व मुख्य परीक्षा पास करून थेट शारीरिक चाचणी पर्यंत पोहोचलेल्या श्रीकांत तुमसरे यांची शासकीय नोकरी ०.७ सेंटीमीटर कमी उंचीमुळे हुकली आणि आता ते एका खाजगी शाळेत सहाय्यक शिक्षकाची नोकरी करून झाडीपट्टीच्या नाटका लिहीत आहेत.
पूर्व विदर्भातील झाडीपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये झाडीबोलीतील संगीत मराठी नाटकांची प्रचंड क्रेझ असते. या झाडीबोली मिश्रित मराठी भाषेत सादर होत असतात. दिवाळी संपली कि या नाटकांचा हंगाम या परिसरात चालू होतो. या काळात लाखोंची उलाढाल या परिसरात होत असते.
या माध्यमातून कित्येक कलाकारांना हंगामी स्वरूपाचे रोजगाराचे साधन उपलब्ध होते; परंतु या परिसरात झाडीपट्टीच्या नाटका लिहिणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील परसवाडा येथे राहणारे श्रीकांत तुमसरे गुरुजी यांनी परिसरात झाडीबोलीतील नाटका आपल्या लेखणीतून साकार करून आपले चहात निर्माण केले आहेत.
श्रीकांत गुरुजी यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झाले असले तरी, मराठी भाषेत आपली पकड निर्माण करून त्यांनी नाटकं लिहिली. सोबतच परिसरात होणाऱ्या नाटकांमध्ये भाग घेऊन आपल्या अंगातील सुप्त कलेला वाव दिला व झाडीपट्टीतील नाटकांमध्ये अभिनय क्षेत्रात उतरले. नाटकांमध्ये अभिनय करत असताना नाटक लिहिण्याची त्यांना आवड झाली. नाटक लिखाणातील तांत्रिक बाबी समजून नाटकं लिहायला त्यांनी सुरुवात केली. झाडीपट्टीत सलग तीन वर्ष गाजलेले व आताही गावागावात सादर होणारे 'तूच माझा भाग्यविधाता' या नाटकाचे लेखन सर्वप्रथम श्रीकांत गुरुजींनी केले व हा प्रवास आजही सुरूच आहे.
गुरुजींची लिहिलेली झाडीपट्टीतील नाटकं
तूच माझा भाग्यविधाता, आघात, मृत्युदंड, सूड, त्याग मातृत्वाचा, सौदा जन्मदात्यांचा, भाग्यचक्र, चक्रव्यूह, विश्वासघात, अग्नियुद्ध, हुंडाबळी सारख्या विषयांवर प्रकाश टाकणारी फक्त स्त्री पात्र असलेले नाटक 'स्त्री जन्मा तुझी कहाणी' अशा अनेक मनोरंजक व समाजोपयोगी नाटकांना गुरुजींनी आपल्या लेखणीतून साकारले आहे.
मनोरंजनातून समाज प्रबोधन
"लोकांसमोर जर समाज सुधारण्याच्या गोष्टी सरळ सरळ केल्या, तर त्यांना ते आवडत नाही; परंतु जर त्यांना आपण नाटकाच्या व मनोरंजनाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टी त्यांच्या मनात कुठेतरी छाप सोडून जातात. हाच प्रयत्न मी माझ्या नाटकांतून करत असतो."
- श्रीकांत तुमसरे गुरुजी, नाट्य लेखक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.