यवतमाळ : राजू केंद्रे (Raju Kendre) हे नाव सामाजिक बदलासाठी प्रसिद्ध आहे. दहा वर्षांत त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मेळघाटातील आदिवासींचे प्रश्न, भटके विमुक्तांचे प्रश्न, पारधी बांधवांचे प्रश्न, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविले. तळागाळातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘एकलव्य’चे अनेक विद्यार्थी आज देशातील विविध विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहेत. तरुणांच्या नेतृत्वविकासात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊनच त्यांना युके सरकारने (UK Government) ‘चेवेनिंग’ शिष्यवृत्ती (Chevening Scholarship) बहाल केली आहे. (Pvt.-Raju-Kendre-received-the-Chevening-Scholarship)
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंपरी (खंदारे) हे राजू केंद्रे यांचे मूळ गाव. आई-वडील शेतकरी असून वारकरी संप्रदायाचे आहेत. त्यांच्या घरातील पहिलीच पिढी राजूच्या रूपाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेत आहे. खर तर त्यांना डॉक्टर व्हायचे होते. मात्र, परिस्थितीअभावी शक्य झाले नाही. पुण्यात राहून ‘आयएएस’ची तयारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेही शक्य झाले नाही. बारावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण मुक्त विद्यापीठातून घेणाऱ्या राजूची निवड आज लंडन विद्यापीठात झाली. ‘डेव्हलपमेंट स्टडीज’ या विषयात तो शिक्षण घेणार आहे.
दहा वर्षांत तरुणांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे. येथील सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांशी संपर्क आला. त्यांच्यातील क्षमता ओळखून मार्गदर्शन केले. आर्थिक समस्येमुळे विद्यार्थ्यांची प्रगती खुंटते, ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी ‘एकलव्य’ या संस्थेची स्थापना करून पर्याय उभा केला. विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. आज या संस्थेचे शेकडो विद्यार्थी देशभरातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत.
तरुणांसाठी नेतृत्व केल्यानेच त्यांना ’चेवेनिंग’ शिष्यवृत्ती मिळाली. ही शिष्यवृत्ती युनायटेड किंगडमच्या जगभरातील नेतृत्व विकसनाचा जागतिक कार्यक्रम आहे. या माध्यमातून १६० पेक्षा जास्त देशातील हजारो विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. भारतातून ३० ते ३५ विद्यार्थ्यांना ही संधी मिळते. भविष्यातील नेतृत्व घडविण्याची ही सुवर्णसंधी असते. २०१२ पासून नऊ वर्षे समाजातील तळागाळातील घटकांच्या उन्नतीसाठी व तरुणांच्या विकासासाठी कार्य केले. याच अनुभवाच्या आधारावर ही शिष्यवृत्ती मिळाल्याचे प्रा. राजू केंद्रे यांनी सांगितले.
तळागाळातील लोकांमध्ये क्षमता आहे. त्यांना फक्त संधीची गरज असते. सिनेअभिनेते नागराज मंजुळे, धर्नुधर दीपा कुमारी हे त्याचे बोलके उदाहरण आहे. सरकारने तळागाळातील लोकांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आय. आय. टी. झालेले अनेक विद्यार्थी विदेशात नोकऱ्या करतात. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाला होत नाही. भारत हा युवकांचा देश आहे. युवाशक्तीचा उपयोग देशाच्या विकासासाठी व्हायला हवा. जे युवक विदेशात उच्च शिक्षण घेतात, त्यांनी मायदेशी परत येऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहनही प्रा. राजू केंद्रे यांनी केले.
(Pvt.-Raju-Kendre-received-the-Chevening-Scholarship)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.