उमरखेड (जि. यवतमाळ) : असे म्हणतात, ‘तुम्ही फक्त उडायचे ठरवा, दिश्यांची वाण नाही; सोबतीला जिद्द ठेवा, तुम्हाला तुफानही रोखणार नाही.’ लग्न झालं तेव्हा ती दहावीत होती. आता ती दोन मुलांची आई आहे. संसार सुखाने सुरू आहे. बी. कॉम व एम. कॉम अशा दोन पदव्यांची तिच्या गरीब संसारात श्रीमंती आहे. गरिबी संकल्पाच्या पंखाआड कधीच येऊ शकत नाही, हेच तिने सिद्ध करून दाखविले आहे. ‘रडत’ बसण्यापेक्षा तिने ‘लढणे’ शिकले म्हणूनच ती जिंकली आहे. तिला नेट, सेट होऊन प्राध्यापक बनायचे आहे. ज्ञानाचा संसार फुलवायचा आहे.
रजनी महादेव श्रोते हे तिचे लग्नानंरतरचे नाव. तीन वर्षांची असतानाच वडिलांचे निधन झाले. आईसह रजनी मामाच्या गावी आली. गरीब असल्याने मामासह शेतात राबली. तीन किलोमीटर पायदळ चालून तिने प्राथमिक शिक्षण घेतले. हुशार असल्याने तिच्यावर शिक्षकांची मोठी माया. त्यांनी तिला शाळेचा गणवेश, पुस्तके, शैक्षणिक साहित्य पुरविले. त्यांचा विश्वास सार्थ ठरवीत रजनीने भरपूर अभ्यास केला. दहावी झाल्यावर तिचे लग्न ठरले. मंदिरात हार टाकून लग्न झाले.
आता शिकायची इच्छा पूर्ण होणार नाही, असे तिला वाटत होते. तिने ही खंत पतीजवळ बोलून दाखविली. पती महादेव यांनीसुद्धा तिला शिक्षणासाठी मोकळीक दिली. लग्नानंतर अकरावी, बारावी तिने माहेरीच पूर्ण केले. त्यानंतर पदवीचे शिक्षण उमरखेड येथील गो. सी. गावंडे महाविद्यालयात घेतले. दोन मुले सांभाळून तिने बी. कॉम. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले.
एकीकडे संसाराचा गाडा चालवायचा अन् दुसरीकडे शिक्षणाची पायवाट तुडवायची. धुनी, भांडी करायची. लोकांच्या घरचा स्वयंपाक करायचा. कधी शेतात जाऊन रोजमजुरी करायची. पुसद येथे २०१९ मध्ये तिने एम. कॉम. या वाणीज्य शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तिने पदव्युत्तर पदवीतही घवघवीत यश प्राप्त केले.
आज ती ब्यूटी पार्लर व शिवणकाम करून संसाराचा गाडा योग्य चालवत आहे. तिला नेट, सेट परीक्षा यशस्वी करून प्राध्यापक व्हायचे आहे. तिच्या पंखांमध्ये प्रबळ इच्छाशक्तीचे बळ आहे. ही वाट सुकर नसली तरी ती चालण्याचे बळ तिच्या पंखात आहे. संकल्प पूर्ण होवो म्हणून तिला अनेकांकडून प्रोत्साहन मिळत आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्राध्यापक बनायची इच्छा
पतीच्या प्रोत्साहनामुळेच घर सांभाळून उच्च शिक्षण घेता आले. पुढील शिक्षण पूर्ण करून प्राध्यापक बनायची इच्छा आहे. माझ्या पंखांना पतीचे बळ लाभल्याने पुढील वाटचालही सुकर होईल, असा विश्वास आहे.
- रजनी महादेव श्रोते, उमरखेड
संपादन - नीलेश डाखोरे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.