आरमोरी (जि. गडचिरोली) : प्रत्येक गावाचा इतिहास असतो. आणि प्रत्येकच गावात त्या गावाला भुषण ठरतील, अशी ऐतिहासिक स्थळेही असतात. विदर्भाला तर प्राचीन संपन्न वैभवशाली इतिहास लाभला आहे, त्यामुळे इथल्या प्रत्येकच गावात किल्ले, तलाव, गढी अशा ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतात. मात्र त्या ऐतिहासिक वास्तुंचे किंवा स्थळांचे जतन खूप महत्त्वाचे असते.
आरमोरी शहरही याला अपवाद नाही. शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक रामसागर तलावाच्या मागे अनेक वर्षांपासून समस्यांचे शुक्लकाष्ठ लागेल आहे. एकेकाळी आपल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या तलावाचे सौंदर्य लोप पावले असून त्याची जागा घाण व दुर्गंधीच्या साम्राज्याने घेतली आहे. त्यामुळे आरमोरची शान असलेला हा तलाव दयनीय अवस्थेत असून याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या आरमोरी शहरातील रामसागर तलावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सार्वजनिक दुर्गा माता देवस्थान मंदिराच्या अगदी जवळच असलेल्या या रामसागर तलावाजवळच सार्वजनिक दुर्गा माता देवस्थान आहे. दुर्गादेवी घटस्थापना कालावधीत रामसागर तलाव परिसरात असलेल्या मंदिराला जिल्ह्यासह विदर्भातील लाखो भाविक भेट देऊन पूजन करतात.
तलावाचे सुशोभिकरण होण्याच्या दृष्टीने तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ काही प्रमाणात गटारे, तलावाची पाळ, धोबीघाट आदी कामे करण्यात आली. मात्र, शहरातील प्रत्येक वॉर्डातील घनकचरा, दुर्गंधीयुक्त सांडपाणी, मलमूत्र या तलावात सोडले जात आहे. तसेच अनेक नागरिक उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे तलावा घाण होतो आहे. तलाव परिसरालगत मासळी, मटण मार्केट असल्यामुळे येथील कचराही याच तलावाच्या कडेला फेकला जातो. मोकाट डुकरे, कुत्रे यांचे मृतदेह तलाव परिसरातच फेकले जातात. त्यामुळे तलावाला अवकळा आली असून या सुंदर तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
तलावालगत काही विद्यालये, नागरिकांचे वास्तव्य असल्याने त्यांचेही आरोग्य धोक्यात सापडले आहे. आरमोरी शहराला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त होऊन बराच काळ लोटूनही विकास कामांना प्रारंभ करण्यात आला नाही. उलट अनेक भागांतून तक्रारीचा सूर उमटत आहे. नगर परिषदेने हा ऐतिहासिक तलाव जपण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पाच कोटींचा प्रस्ताव
रामसागर तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी शासन दरबारी 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. यात तलावातील गाळ काढणे, उपसा करणे, ज्यातून सांडपाणी येते अशा नाल्या एकत्रित अडवून ते पाणी फिल्टर करून तलावात सोडणे आणि तलावालगत असलेले मटण मार्केट पोलिस स्टेशनच्या बाजूला हलविणे आदी कामांचा समावेश आहे. पण, अद्याप हा प्रस्ताव मंजूर झाला नाही. प्रस्ताव मंजुर होऊन निधी मिळताच काम सुरू करू, अशी माहिती नगराध्यक्ष पवन नारनवरे यांनी दिली आहे.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.