तिरोडा (जि. गोंदिया) : ‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’ या उक्तीप्रमाणे शहरातील रेशन दुकानदार महेश बालकोठे व पत्नी राणी या दाम्पत्याने १० बेघरांना घरकुलासाठी स्वतःच्या मालकीची जमीनच नव्हे, तर काहीअंशी आर्थिक मदतही केली. घरकुलांच्या मध्यभागी मंदिरही उभारले. घरकुलाच्या माध्यमातून एकप्रकारे संसार थाटून दिला. त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.
लहानपणापासून समाजकार्याची आवड असलेले महेश बालकोठे सांगतात, मला गरजू व्यक्तींना मदत करायला फार आवडते. मी आतापर्यंत गरजू विद्यार्थ्यांना मदत केली आहे. बाहेर गावाहून आलेल्या पाच विद्यार्थ्यांना डी.एड्. करण्यासाठी स्वतः अडीच वर्षे आर्थिक मदत केली. जमीन दान करून गरिबांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी आपली इच्छा होती. ते स्वप्न दहा गरजू लोकांना जमीन दान देऊन पूर्ण झाले. या सर्व कार्यात पत्नी राणी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
मंदिर बांधून बेघरांसाठी घरे बांधावी यासाठी २०१० मध्ये भूमिपूजन याच ठिकाणी केले गेले होते. दहा बेघर लोकांना भूखंड दिल्यानंतर त्यांना सरकारच्या घरकुल योजनेतून घरासाठी तुटपुंजी आर्थिक मदत मिळाली होती. यात चांगले घर होणे शक्य नव्हते. त्यामुळे बालकोठे दांपत्यांनी जवळचे पैसे खर्च करून एकत्रितपणे मजबूत घरे बनविली.
नागपूर येथील व्यावसायिक समाजरत्न पुरस्काराने सन्मानित दीपक सूचक यांच्या आर्थिक साहायाने सत्यसाई, साईबाबा, अन्नपूर्णा, गणपती, शेषनाग, पंचमुखी हनुमान, विशाल शिवलिंग व नंदीमूर्ती जयपूर येथून आणून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. वास्तू पूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
यावेळी बंगळुरूचे संजय किणी, गोंदिया येथील सुशील अग्रवाल, पूजा तिवारी, भंडारा येथील धनराज माहुळे, मुनेश्वर कापगते, चिचटोला येथील प्रकाश गहाणे, केशोरी येथील गजानन परिहार, बुलडाणा येथील दीपक गायकवाड, वाशीम येथील दिलीप केकर अन्य उपस्थित होते.
बालकोठे दाम्पत्याने जमीन दान दिल्याने सुनीता रोडे, संजय शेंडे, सकुनबाई आंबेडारे, पूर्णाबाई तितीरमारे, अशोक असाटी, प्रभुदास जांगडे, रेखा नागपुरे, दीपक नानोटी, - मुक्ताबाई ढाबाळे, अंबादास गोटेफोडे आदींना हक्काचे घर मिळाले आहे.
स्वप्न बालकोठे दाम्पत्याने पूर्ण केले
बालकोठे दाम्पत्याने आम्हाला घर बांधून दिले. त्यांचे हे कार्य कधीच न विसरण्यासारखे आहे. मी रुग्णालयात वेटर म्हणून काम करतो. मला घर बांधणे शक्य नव्हते. मात्र, घराचे स्वप्न बालकोठे दाम्पत्याने पूर्ण केले आहे.
- संजय शेंडे, लाभार्थी
लहानपणाचे स्वप्न पूर्ण
माझे लहानपणापासून स्वप्न होते की, गरजूंपर्यंत आपली मदत पोहोचली पाहिजे. हे स्वप्न दहा जणांना घरकुलासाठी जमीन देऊन पूर्ण झाले. याचा मला फारच आनंद आहे.
- महेश बालकोठे, तिरोडा
संपादन - नीलेश डाखोरे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.