भोजापूर (जि. भंडारा) : पवनी तालुक्यातील सावरला, खातखेडा, भोजापूर, सोमनाळा, कन्हाळगाव, सिरसाळा व ढोरप आदी गावांचा मागास क्षेत्र म्हणून ओळख आहे. परंतु, चार-पाच वर्षांपासून गोसे धरणाच्या उजव्या कालव्यामुळे या परिसरातील जनतेचे नशीब बदलत आहे. भोजापूर परिसराला सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी व शेतमजुरांना वर्षभर काम मिळत आहे. त्यामुळे चौरासमधील मागास गावांकडे पाहण्याचा नागरिकांच्या दृष्टीकोनातही बदल होत आहे.
आजघडीला या परिसरातून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार शेत दिसतात. रस्त्यावरून प्रवास करत असताना जेथपर्यंत दृष्टी टाकली तेथपर्यंतचा शेतातील पीक मन मोहून टाकतात. जंगलातून वाहणारे थंड वारे, पक्ष्याची किलबिल देहभान हरपून घेतल्याशिवाय राहात नाही. या पूर्वी या परिसरातील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. पाऊस पडला तरच खरीपातील पीक घेता यायचे. अन्यथा कधी कोरडा तर, कधी ओला दुष्काळ हा नित्यनेमाने घडत होता.
या परिसरातील लोकांना नेहमीच पोटापाण्यासाठी दूर शहरात जावे लागत होते. लहान मुले कुटुंबात घरी ठेवून ढोर मेहनत करण्यासाठी इथले युवक महानगरात जात होते. परंतु, मागील चार-पाच वर्षापासून या परिसरातील जनतेची परिस्थिती बदलण्यासाठी गोसे धरणाचा उजवा कालवा कारणीभूत ठरला. हा कालवा सावरला गावाच्या पलीकडे जाऊन चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेला भिडला. तेव्हापासून प्रायोगिक तत्त्वावर उजव्या कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्यास सुरुवात झाली.
दरवर्षीच खरीप व उन्हाळी हंगामात शेतीला पाणी देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे या परिसरातील शेतकरी तब्बल तीन पीक घेत आहेत. त्यामुळे पाहता-पाहता या परिसरातील शेतकरी व शेतमजूरांना वर्षभर काम मिळत असून त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळत आहे. त्यामुळे मजुरी करणार आपल्या मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांसोबत शहरात उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवत आहेत. आजच्या घडीला या परिसरातील कित्येक मुले डॉक्टर, इंजिनिअर, वकील या सारखे उच्च शिक्षण घेत आहेत.
पूर्वी या परिसराकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच होता. चौरास परिसरातील जनता या परिसराकडे हीनदृष्टीने बघत होती. आपल्या मुलींचे परिसरातील मुलांसोबत लग्न करण्यासाठी अनुकूल नसत. झाडीपट्टीत मुलीचे लग्न केल्यास तिला जंगलात सरपणासाठी जावे लागते अशी अपेक्षा बहुसंख्य पालकांची होती.
परंतु आता परिस्थिती बदलली आहे. धरणाच्या कालव्यामुळे हा परिसर सुजलाम् सुजलाम् झाला. या परिसरातील जनता आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात जिल्ह्याचा नेतृत्व करत आहेत. ही सर्व किमया गोसे धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे घडून आली. यामुळेच या परिसराला सुगीचे दिवस आलेले आहेत. या भागातही समृद्धी नांदण्यास सुरूवात झाली आहे.
कालवा ठरला देवदूत
परिसरासाठी गोसे धरणाचा उजवा कालवा वरदान ठरला आहे. उजवा कालवा नसता तर आमची परिस्थिती कधीच बदलली नसती. आपल्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात पाठवू शकलो नसतो. आमच्यासाठी हा कालवा देवदूत ठरला आहे.
- तुळशीदास कुर्झेकर,
शेतकरी, सोमनाळा
गाव सोडून जावे लागत नाही
उजव्या कालव्याद्वारे शेतीला पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे वर्षातून अनेक पीक घेणे शक्य झाले आहे. विशेषतः नगदी पिकांचे उत्पादन वाढत आहे. त्यामुळे हातात नेहमी पैसा असतात. परिसरात मजुरी करणाऱ्या लोकांना वर्षभर काम मिळते. त्यामुळे त्यांना कामाच्या शोधात गाव सोडून जावे लागत नाही.
- हंसराज गजभिये,
माजी पंचायत समिती सदस्य, सावरला क्षेत्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.