मोवाड (जि.नागपूर) : ज्या वर्धा नदीने मोवाड शहराला नेस्तनाबूद केले. 28 वर्षांआधी रौद्र रूप घेऊन वर्धेने 204 लोकांना जलसमाधी घडविली होती. त्याच वर्धेला नवे जीवन देण्याचा संकल्प मोवाडवासींनी यंदा लोकसहभागातून केला. मागील 28 वर्षांत दुथडी भरून न वाहिलेल्या वर्धेच्या दोन्ही थड्यांना पाण्याने शिवले. कोरड्या पडलेल्या वर्धा नदीत पाणी वाहून येताना मोवाडवासींच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले.
30 जुलैचे 1991 च्या काळरात्रीला 28 वर्षे होत आहेत. पूर म्हटला तरी मोवाडवासींच्या अंगावर शहारे येतात. महापुरात 204 मोवाडवासींना व 14 जलालखेड्याच्या नागरिकांना जलसमाधी मिळाली होती. मात्र या 28 वर्षांत बरेच काही बदलले आहे. महापुरानंतर वर्धा नदी दुथडी भरून वाहिलीच नाही. उथळ झाल्याने शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी मोवाडवासी नागरिकांसमोर भीषण पाण्याचे संकट उभे ठाकले. नदीला कोरड पडली. वर्धेवर नाराज असलेल्या मोवाडवासींनी तिच्यावरचा राग दूर करीत नदी खोलीकरणाचा संकल्प केला.
मोवाड फाउंडेशनच्या माध्यमातून नदी खोलीकरणाला मोवाडवासींचे हात लागले. जनसामान्यांची हे तप कामी आले. जलसंचयाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे याचीच प्रत्येक मोवाडवासी आतुरतेने वाट पाहत होता. पावसाचे दोन महिने उलटून गेले तरी वर्धा कोरडीच होती. जलमित्र व गावकऱ्यांना वर्धा नदीच्या दर्शनाशिवाय घास जात नव्हता. वर्धा मोवाडवासींच्या प्रयत्नांची परीक्षाच पाहत होती. महादेवाच्या डोंगरात झालेल्या दमदार पावसानंतर शनिवारी वर्धा जलसमृद्धी घेऊन धावत आली. कोरड्या नदीपात्रात खळखळ वाहणारे पाणी पाहून मोवाडवासींच्या आशा पल्लवित झाल्या. आता मोवाडवासींचा वर्धेवरील राग उतरला आहे, ती जीवनदायनी, समृद्धीचे कारण असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
पाणी पाटातही अन् डोळ्यातही
वर्धा नदीच्या कोरड्या पात्रातून खळखळ वाहत आली. खोलीकरण करण्यात आलेले डोह क्षणात भरल्या गेले. हे दृश्य डोळ्यात साठविण्यासाठी जो तो नदीचे पाणी बघण्याकरिता धावत होता. खळखळ वाहणाऱ्या नदीकडे बघून मोवाड फाउंडेशनचे कार्यकर्ते, जलमित्र, तसेच नागरिकांचा अक्षरश: ऊर दाटून आला. नदीच्या पाटातील पाणी पाहून मोवाडवासींच्या भावना पाणी होऊन डोळ्यातून अश्रुरूपातून वाहू लागल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.