भोसलेकालीन इतिहासाचा साक्षीदार सहानगड किल्ला...वाचा सविस्तर 

file photo
file photo
Updated on

कुंभली (भंडारा) : साकोलीपासून 17 कि.मी. अंतरावर सानगडी हे गाव आहे. सान म्हणजे लहान व गढी म्हणजे गड अर्थात सहानगड या लहानशा किल्ल्यावरूनच या गावाला सानगडी हे नाव पडले आहे. 1734 मध्ये उभारण्यात आलेला हा किल्ला व येथील अष्टधातूंची तोफ आजही भोसलेकालीन इतिहास व वैभवाची साक्षीदार म्हणून तटस्थपणे उभी आहे. 

आज साकोली हे तालुक्‍याचे ठिकाण असले, तरी नागपूरकर भोसले यांच्या काळात अगदी 1867 पर्यंत सानगडी हे तालुक्‍यातील महत्त्वाचे ठिकाण होते. त्यासाठीच येथे गढीवजा किल्ल्याची निर्मिती झाली. 
गावाबाहेरील उंच टेकडीवर नागपूरचे रघूजी राजे भोसले यांनी 1734 मध्ये हा किल्ला बांधला. किल्ल्याचा दरवाजा आजही सुस्थितीत असून देखरेख नसल्याने किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पडक्‍या तटबंदीमधून गडावर प्रवेश होतो. आयताकृती आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर दीड एकर परिसरात पसरला आहे. मध्यभागी असलेल्या या बुरुजावरून संपूर्ण किल्ला व दूरवरचा परिसर दृष्टीस पडतो.

किल्ल्याची तटबंदी व खालील भाग दगडांनी व वरील भाग विटांनी बांधला आहे. किल्ल्याच्या तटबंदीची बरीच पडझड झाली आहे. किल्ल्याची भिंत काही भागात गोलाकार आहे. प्रवेशद्वार मजबूत विटांचा असून मागील भागात चौकीदारासाठी एक कक्ष आहे. किल्ल्याच्या मधोमध एक गोलाकार तोफ फिरविण्याचे स्थान असून त्याचा आकार 10 ते 12 मीटर आहे. प्रवेशद्वारासमोर काही अंतरावर चौकोनी भिंत असून तिचे छत पडले आहे. यालाच पूर्वी रंगमहल म्हणत असत. उत्तर-पूर्व व दक्षिण दिशेत दोन-दोन द्वार आहेत. किल्याच्या परिसरात 5 विहिरी होत्या. त्या कालांतराने झाडेझुडपे व मातीने बुजल्या. 

ऐतिहासिक पार्श्‍वभूमी 
इ.स. 1700 मध्ये बख्त बुलंदशहा यांची छिंदवाडा जिल्ह्यात राजधानी असताना भंडारा विभागात सानगडी ते प्रतापगड आणि तिरोडा ते आंबागडपर्यंतचा प्रदेश आपल्या राज्याला जोडून घेतला. याच वंशातील वलीशहा यांचा पराभव करून रघूजी राजे भोसले यांनी ते राज्य राणी रतनकुंवरला परत केले. या राणीने रघूजी राजे भोसले यांना आपला तृतीय पुत्र मानून आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा नागपूर आणि भंडारा हे दोन प्रांत भेट स्वरूपात दिले. तेव्हा भंडाऱ्याची वैनगंगा प्रांत अशी ओळख होती. राजे रघूजी यांच्या वंशातील शेवटचे राजे अप्पासाहेब भोसले यांचे सहानगड येथे देहावसान झाले. या किल्ल्याच्या आवारात वलीखान यांची समाधी असून एक जुनी विहीर आहे. 

अष्टधातूची तोफ झाली देवी 
सहानगड किल्ल्याच्या बुरुजावर व्याघ्रमुखी अष्टधातूंची मोठी व वजनदार तोफ आहे. तिची लांबी 11 फूट व व्यास पाच फूट असून पाच कडे आहेत. इंग्रजांनी ही तोफ नेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. तोफेपासून काही अंतरावर 10 ते 12 किलो वजनाचा लोखंडी गोळा आहे. 
पुढे या तोफेशी काही दंतकथा जोडून लोकांनी तिची पूजाअर्चा करायला सुरुवात केली. आता ती तोफमाय, तोफेश्‍वरी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. भोसल्यांनीसुद्धा शेकडो बैलजोड्या व हत्ती लावून तिला हलविण्याचा प्रयत्न केला; पण ती जागची हलली नाही. नवस फेडण्याच्या नावाखाली प्राण्यांचा बळी देण्याचे प्रकार होत असल्याने हा ऐतिहासिक वारसा दुरावत आहे. 

बाहुली विहीर 
सानगडीमध्ये दोन प्राचीन बाहुली विहिरी आहेत. या भोसलेकालीन विहिरींचे बांधकाम फक्त दगडांनी केले असून, विहिरीत 50 ते 60 पायऱ्या आहेत. आतील भागात राहण्यासाठी मोठमोठ्या खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये भोसलेकालीन लोक युद्धाच्या वेळी मुक्कामाने राहायचे. गुप्त खलबते, सल्लामसलती करण्यासाठी त्यांचा उपयोग होत असावा. खोल्यांच्या पुढे आतमध्ये गेल्यावर खोल गर्तेत वर्षभर थंडगार पाणी असते. परंतु, अलीकडे त्यांचा वापर कोणी करीत नाही. दोनपैकी एक विहीर बुजली आहे. 

स्वातंत्र्य सैनिकांनी फडकला होता तिरंगा 
पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रमुख केंद्र म्हणून या गावाची ओळख होती. देशभक्ती व स्वातंत्र्याच्या ऊर्मीने भारावलेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात योगदान दिले. याच सहानगड किल्ल्यावर 14 ऑगस्ट 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, त्याच मध्यरात्री जगन्नाथ गोल्लीवार, सोमाजी बोकडे व गावकऱ्यांनी तिरंगा ध्वज फडकविला होता. त्याचाही सहानगड साक्षीदार आहे.

जोपासनेकडे दुर्लक्ष 
सहानगड किल्ल्याच्या परिसर निसर्गरम्य असून नजीक तलाव आहे. पर्यटक, भाविक व हवसेनवसे येथे हजेरी लावतात. परंतु, किल्ल्याच्या परिसरात ओल्या पार्ट्या रंगतात. मद्यपान केले जाते. स्वयंपाकाचे उरलेले अन्न टाकून दिले जाते. या ऐतिहासिक वारशाची जोपासना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. या स्थळाच्या नावाने असलेल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून अनेकदा याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु लोकप्रतिनिधींनी स्वारस्य दाखविलेले नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.