गोंदिया : वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने बुधवारी (ता.१५) सकाळी नऊच्या सुमारास महालगाव-मुरदाडाजवळ ट्रॅक्टरला धडक दिली होती. या अपघातात महालगाव येथील प्रशांत धर्मराज आगाशे (वय २४) याचा जागीच मृत्यू, तर गुलशन बळीराम कावळे (वय १९) या गंभीर जखमीचा रात्रीला मृत्यू झाला. या घटनेनंतर महालगावासी संतप्त झाले. जमावाने प्रशांत आगाशे याचा मृतदेह रात्री दवनीवाडा पोलिस ठाण्यात नेऊन आक्रोश व्यक्त केला. शिवाय गुरुवारी (ता. १६) सकाळी ११ वाजेपासून मृत गुलशन कावळे याचा मृतदेह घेऊन महालगाव येथे चक्काजाम आंदोलन केले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण होऊन परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले.
बुधवार, १५ जून रोजी सकाळी प्रशांत आगाशेसह गोविंद धर्मराज आगाशे (वय ३५), विशाल मुन्नालाल नागपुरे (वय २२), गुलशन बळीराम कावळे (वय १९), उमेश शंकर आगाशे (वय १८) व शैलेश मुलचंद भोयर (वय २२, सर्व रा. महालगाव) आदी मजूर शेतात खत टाकण्यासाठी ट्रॅक्टरने (एमएच ३५/ ए. जी. ०६२८) गेले होते. शेतात खत टाकल्यानंतर परत येत असताना वाळू भरून गोंदियाच्या दिशेने येत असलेल्या टिप्परने (एमएच ३५/ ए. जे. ४०९९) ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, ट्रॅक्टर टिप्परच्या खाली येऊन पूर्णतः चेंदामेंदा झाला. यात प्रशांत आगाशे याचा जागीच मृत्यू झाला. गोविंद आगाशे, विशाल नागपुरे, गुलशन कावळे, उमेश आगाशे व शैलेश भोयर हे जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर होती. घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्परला आग लावून जाळून टाकले होते. गंभीर जखमींवर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
तथापि, मृत प्रशांत आगाशे याचा मृतदेह घेऊन नातेवाईक व गावकऱ्यांनी रात्रीच थेट दवनीवाडा पोलिस ठाणे गाठले. मृताच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत देण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत मृतदेह पोलिस ठाण्याच्या दारातच ठेवला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मृताच्या नातेवाइकांना टिप्पर मालकाकडून दीड लाख रुपये आणि जखमींवर स्वतःकडून उपचार करण्याचे आश्वासन मिळाल्याने गावकऱ्यांनी मृतदेह उचलला.
मात्र, गंभीर जखमींपैकी गुलशन कावळे याचाही बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे पुन्हा संतप्त गावकऱ्यांनी गुरुवारी (ता. १६) सकाळी ११ वाजेपासून महालगाव-मुरदाडाजवळ चक्काजाम आंदोलन केले. महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. जमावाचा रोष पाहून पोलिसांना अधिकची कुमक बोलवावी लागली. सायंकाळी वृत्त लिहिपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरूच होते. या घटनेमुळे महालगाव येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
पोलिस वाहनाच्या फोडल्या काचा
संतप्त जमावाला पांगविण्यासाठी दुपारी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी जमावाने आणखी उग्र रूप धारण करीत पोलिसांवर धावा केला. यात पोलिस अधिकारी व काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती असून, जमावाने पोलिस वाहनाच्या काचाही फोडून नुकसान केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.