या प्रयोगशील शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम...मल्चिंग पेपरवर पीक घेऊन वाचविला अर्धा खर्च

यवतमाळ : आपल्या शेतात शेतकरी वैभव कल्यामवार.
यवतमाळ : आपल्या शेतात शेतकरी वैभव कल्यामवार.
Updated on

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : "शोध ही गरजेची जननी आहे', असे म्हटलं जाते. गरज माणसाला शोध लावण्यास प्रवृत्त करीत असते. अशाच प्रकारचा शोध मजुरांच्या गरजेतून लावीत त्यावर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न तालुक्‍यातील अर्ली येथील प्रयोगशील शेतकरी वैभव कल्यामवार यांनी केला आहे.

मल्चिंग पेपरवर सोयाबीन व तुरीचे पीक घेऊन एकरी सात हजार रुपये खर्च वाचविण्यासोबतच पिकांच्या उत्पादनातही मोठी भर पडणार आहे.

शेतकरी वैभव कल्यामवार यांनी गेल्या जूनमध्ये सात एकरांवर कपाशीचे पीक घेतले. एकरी पाच क्विंटल कपाशीचे उत्पन्न झाल्यावर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे त्यांनी डिसेंबरमध्ये कपाशीचे पीक काढून सात एकरात टरबुजाचे पीक घेतले. टरबुजाचे पीक घेताना त्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला. टरबुजाचे पीक भरपूर झाले. परंतु, उन्हाळ्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने टरबुजाला फारसी मागणी नव्हती. त्यामुळे टरबूज अत्यंत कमी दरात विकावे लागले. त्यामुळे वैभव कल्यामवार यांना आर्थिक फटका बसला. "कोरोना'मुळे मजूरही मिळेनासे झालेत.

इकडे आता खरीप पिकांची लागवड करण्याची घाई गडबड सुरू झाली. त्यात मजुरांची कमतरता, काय करावे, या चिंतेत असताना कल्यामवार यांच्या डोक्‍यात एका कल्पनेने जन्म घेतला आणि लगेचच त्यावर प्रायोगिक तत्त्वावर का होईना आपण हा प्रयोग करावा, असा त्यांनी ठाम निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी सातपैकी पाच एकरांत मल्चिंग पेपर काढून टाकला, तर दोन एकरावर मल्चिंग पेपर तसाच ठेवल्याने त्यांना पिकांची तुलना करता येऊ लागली. पाच एकरांत आपल्या पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तुरीचे पीक घेतले, तर दुसरीकडे दोन एकरात मल्चिंग पेपरचा वापर करीत तेथेही सोयाबीन व तुरीचे पीक घेतले.

टरबुजांच्या वेळी वापरलेले मल्चिंग पेपर काढण्यासाठी एकरी एक हजार रुपये खर्च येत होता. शिवाय ड्रीप काढणे, रोटावेटरचा वापर करून नांगरणी करणे, या सर्वांसाठी एकरी सात हजार रुपये खर्च येत होता. हा खर्च वाचविणे व मजुरांची कमतरता या साऱ्या गोष्टींमुळे मल्चिंग पेपरवरच सोयाबीन व तुरीचे पीक घेण्याचा निर्णय घेतला आणि तशी अंमलबजावणीदेखील केली.

अर्धा खर्च वाचला

मल्चिंगवरच पिके घेतल्याने त्यांना ड्रीपद्वारे पाणी देता आलं व पाण्याचे बाष्पीभवनाची क्रिया कमी झाल्याने कमी पाणी लागले. मल्चिंग पेपरमुळे गवत निघाले नाही. त्यामुळे सोयाबीन व तुरीला कोणासोबत कॉम्पिट करावं लागले नाही. त्यामुळे निंदणाचा खर्चदेखील वाचला. बियाण्यांमध्येही बचत झाली. एकरी केवळ 12 किलो बियाणे लागले, की जेव्हा पारंपरिक पद्धतीत 27 किलो बियाणे लागले. त्यामुळे बियाण्यांमध्येही आर्थिक बचत झाली, अशी माहिती शेतकरी कल्यामवार यांनी "सकाळ'ला दिली.
दरम्यान, एमबीए असलेले शेतकरी कल्यामवार यांनी केलेला प्रयोग पाहण्यासाठी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात शेतकरी येत आहेत.

पिकांची झपाट्याने वाढ
पिकांना ड्रीपमधूनच खत देता येत असल्याने खतांचा खर्चही कमी झाला. मल्चिंग पेपरचा वापर करून व पारंपरिक पद्धतीने लागवड यामध्ये मल्चिंग पेपरच्या लागवडीत पिकांची झपाट्याने वाढ होते. म्हणून पीक निघण्याआधीच एकरी सात हजार रुपये खर्च कमी झाला. म्हणजे तेवढे उत्पन्नच झाले आहे.
- वैभव कल्यामवार, प्रयोगशील शेतकरी, अर्ली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.