बापरे! 123 मुलांचे वडील आहेत शंकरबाबा : सर्वांनी केले मतदान

File photo
File photo
Updated on

परतवाडा (जि. अमरावती) : येथून जवळ असलेल्या वज्झर येथील स्वर्गीय अंबादास वैद्य मतिमंद मूकबधीर बेवारस बालगृहातील शंकरबाबा पापळकर यांच्या 123 मुलांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजावला.
अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधीर बेवारस अनाथ बालगृह हे भारतातील एकमेव पुनर्वसन केंद्र आहे. या बालगृहात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून बेवारस दिव्यांग मुले आजीवन पुनर्वसनाकरिता दाखल होतात. सोमवारी सर्वत्र लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना विधानसभेच्या निवडणुकीला दुसऱ्यांदा या बालगृहातील 123 दिव्यांग मुलामुलींनी येथील जिल्हा परिषद शाळेत एक किलोमीटर चालत जाऊन मतदानाचा अधिकार बजावला. सर्व मुलांच्या वडिलांचे नाव शंकरबाबा पापळकर पाहून निवडणूक अधिकारी अचंबित झाले असल्याचे चित्र होते. मतदान केल्यानंतर सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद होता.

पायीच गाठले मतदानकेंद्र
मुलांना ने-आण करण्यासाठी गाडीची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात येणार होती. मात्र शंकरबाबा पापळकर यांनी ते नाकारून मतदानकेंद्रापर्यंत स्वयंस्फूर्तीने पायी जात मतदानाचा हक्क बजावला.

123 निराधार मुलांचे वडील झालेले शंकरबाबा
अचलपूर जवळच वज्झर नावाचे छोटेसे गाव आहे. या गावाबाहेर अनेक टेकड्यांच्या कुशीत स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, अपंग, अंध, निराधार, निराश्रित मुलांचे वसतिगृह आहे. या मुलांना आधार देणाऱ्या व्यक्तीचे नाव शंकरबाबा पापळकर. 123 मतिमंद, अंध, अपंग, मूकबधिर मुलांचे ते पिता आहेत. सर्वच मुलांच्या नावापुढे शंकरबाबा पापळकर यांचेच नाव लागते. त्यांनी मुलांच्या मदतीने 15 हजार झाडांचे जंगल तयार केले आहे. या मुलांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी शंकरबाबा यांनी चांगलाच संघर्ष केला. अखेर त्यांना परिश्रमाचे फळ मिळाले व गेल्या निवडणुकीपासून या मुलांना मतदानाचा हक्क मिळाला. या मुलांच्या शिक्षणापासून तर त्यांच्यावरील उपचार व त्यांचे लग्न लावून देण्याची जबाबदारीसुद्धा शंकरबाबा यांनीच सांभाळली असून आजवर 30 मुलामुलींचे लग्न त्यांनी केले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य या मुलांसाठी दर महिन्याला एक लाख रुपयाचा किराणा देतात. 2014 मध्ये सरकारने या बालगृहाला 25 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. परंतु हे अनुदान मुलांसाठी नव्हे तर कर्मचाऱ्यांसाठी होते. त्यामुळे शंकरबाबा पापळकर यांनी ते नाकारले. 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना बालगृहात ठेवता येत नाही, असा नियम आहे. परंतु अपंग, मतिमंद, दृष्टिहीन मुले व मुली कुठे जाणार? असा सवाल करून या मुलांना शेवटपर्यंत याठिकाणी राहण्याची अनुमती द्यावी, या मुद्यावर सध्या शंकरबाबा पापळकर यांचा लढा सुरू आहे. सर्व मुलांचे आधार कार्डसुद्धा त्यांनी काढले आहेत. 1990 पासून त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरू आहे.

आम्हाला प्रशासन, समाजसेवक, सामाजिक संस्था इतरांची मदत मिळाली असून माध्यमांचेसुद्धा भरपूर सहकार्य आहे. आम्ही स्वयंप्रेरणेने येथे आलो असून मतदानवेळी मुलांमध्ये उत्साह होता.
- शंकरबाबा पापळकर, वज्झर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.