आश्रय देणाऱ्यानेच केला घात; सहनशीलतेचा झाला अंत आणि...

Shelterer attacks on girl
Shelterer attacks on girl
Updated on

अमरावती : आई-वडिलांचे छत्र डोक्‍यावर नसेल तर मुलांचे खूप हाल होतात. जवळच्या नातेवाईकांकडे आसरा घेण्याव्यतिरिक्‍त त्यांना पर्याय नसतो. परंतु तोही आधार नसेल तर मग. समाजातील दुष्ट प्रवृतींच्या लोकांपासून वाचण्यासाठी त्यांना कुठेतरी आधार शोधावाच लागतो. परंतु तोही आधार विश्‍वासाचा हवा. ज्याने आधार दिला त्याचीच नियत फिरली तर... अशीच घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली.

पीडित युवती अमरावती जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी आजीही दगावली. मामा होता, परंतु तोही रोजगाराच्या शोधासाठी पुण्यात निघून गेला. अल्पवयीन मुलीला आधाराची गरज होती. कारण ती एकटीच नसून, तिच्यावर 13 वर्षांच्या लहान भावाचीसुद्धा जबाबदारी आहे. तिने काही महिन्यांपूर्वी दिनेशकडे आश्रय घेतला. दोघेही बहिणी-भाऊ दिनेशच्या आश्रयाने राहत होते. शिवाय शाळेतही जायचे.

नेमके काय घडले

काही दिवस बरे गेल्यानंतर दिनेशची वाईट नजर पीडितेवर गेली. त्याने तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. विरोध केला असता, तिला मारहाण करून जखमी केले. दिनेशच्या आश्रयाने राहत असल्याने तिने कुणाजवळ काहीही न सांगता त्याच्याकडून सुरू असलेला लैंगिक छळ सोसला. अत्याचार वाढत असल्यामुळे पीडितेने छोट्या भावासह दिनेशचे घर सोडले व ती दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली. रविवारी (ता. 19) दिनेशने तिचा दुसऱ्या ठिकाणीसुद्धा पाठलाग केला. तिला सोबत चालण्याचा आग्रह धरला. पीडितेने त्याला नकार दिला असता त्याने तिला भावासमोरच जबर मारहाण केली. अखेर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिनेशविरुद्ध अत्याचार, मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयीन कोठडीअंतर्गत त्याची कारागृहात रवानगी केली.

न्यायालयीन कोठडीत रवानगी

जवळचे कुणीच नातेवाईक नसल्याने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने 13 वर्षांच्या लहान भावासह ओळखीतील दिनेशकडे आश्रय घेतला. परंतु, त्यानेच तिच्या असाहाय्यतेचा फायदा घेतला. दिनेश वानखडे (वय 20, रा. दर्यापूर) याला विशेष न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली, असे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांनी स्पष्ट केले.

दिनेशचा स्वत:वरच वार

ज्यावेळी पीडितेने घर सोडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दिनेशने ब्लेडने स्वत:च्याच हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सुधारगृहात रवानगी

पीडितेच्या व तिच्या भावाच्या भवितव्याचा विचार करून दोघांनाही सद्य:स्थितीत सुधारगृहात पाठविण्याचे ठरले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
तपन कोल्हे, पोलिस निरीक्षक, दर्यापूर.

संपादित : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.