सिंदखेडराजा - किनगावराजा पोलिस स्टेशन हद्दीतील सिंदखेड राजा- मेहकर रस्त्यावरील पिंपळगाव लेंडी शिवारात गायकी ढाब्यामागे अंदाजे २५ ते ३० वर्षीय एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. महिलेचा चेहरा पूर्णपणे जाळण्यात आला आहे, शिवाय हाताची बोटे देखील तोडण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना आज गुरुवारी (३० मे) उघडकीस आली. या घटनेमुळे सिंदखेडराजा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आज घटनास्थळाच्या जवळच राहणारी एक महिला सकाळी फिरायला गेली असता तिला हा मृतदेह दिसला. भेदरलेल्या महिलेने परिसरातील अन्य लोकांना याची माहिती दिली. लगेच किनगावराजा पोलिसांना कळविण्यात आले. ठाणेदार विनोद नरवडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी परिसर प्रतिबंधित करून प्राथमिक तपास केला व मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृत महिला २० ते २५ वयोगटातील असून तिला आधी ठार मारण्यात आले असावे. मध्यरात्रीपासून पहाटेच्या दरम्यान तिचा मृतदेह सिंदखेड राजा ते किनगाव राजा रस्त्यावरील एका पडक्या धाब्याचा मागे आणून टाकण्यात आला. तिची ओळख लपविण्यासाठी नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत महिलेच्या मानेवर मारल्याच्या खुणा असून पोटावर देखील जखमा आहे. दरम्यान, महिलेच्या चेहऱ्यावर जळालेला कापड टाकण्यात आला. तिच्या हाताची बोटे तोडण्यात प्रयत्न झाला असून डाव्या पायाच्या पंजाची बोटे तुटलेली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गळ्यात मंगळसूत्र किंवा अन्य काही नसल्याने सदर महिला अविवाहित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
या घटनेचा तपासासाठी परिसरातील मुख्य रस्त्यावरील सर्व सीसी टिव्ही फुटेज पोलिस तपासणार आहेत तर जवळच्या जिल्ह्यात महिला बेपत्ता असल्याच्या प्रकरणाची माहिती घेतली जाणार आहे.
आसोला प्रकरणाची पुनरावृत्ती
२२ जानेवारी २०२४ रोजी चिखली तालुक्यातील असोला शिवारात एका ढाब्यामागे अशा प्रकारे एका महिला अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. आज घटनेची पुनरावृत्ती झाल्याने त्या प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे असोला प्रकरणाला ५ महिने उलटून देखील अंढेरा पोलिसांना या प्रकरणातील गूढ उकलता आले नाही, त्या तरुणीची ओळख देखील अंढेरा पोलिस आणि तपासासाठी गठित केलेल्या पथकाला पटवता आलेली नाही. आता पुन्हा तशीच घटना ही पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.