नागपूर : आदिवासी महिलांसह इतर महिलांनाही "त्या' भयंकर रोग, आजारांबाबत बोलायला अवघड जाते. लाज किंवा पारंपरिक बंधनांचे ओझे आजही वाहत असल्यामुळे आरोग्याची हेळसांड नेहमीचीच. याविषयी महिलांना बोलते केले, विश्वासात घेतले आणि हेल्थकॅम्पचे आयोजन केले. यामध्ये रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी सर्वच महिला असल्यामुळे मुक्तपणे त्यांनी अडचणी, समस्या मांडल्या. एवढे दिवस रोग, आजाराच्या अंधारात राहिलेल्या या महिला आता आत्मविश्वासाने पुढे येऊन आपल्या व्यथा सांगतात. तेव्हा एका गाण्याच्या ओळी आठवतात "फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश'. डॉ. हर्षा नन्नावरे आपल्या भावना व्यक्त करीत होत्या.
यवतमाळ जिल्ह्यातील एका लहान खेड्यात डॉ. हर्षा यांचे बालपण गेले. वडील शिक्षक असल्यामुळे अभ्यासाची गोडी लागली. ग्रामीण भागातील दुःख, विविध आजार यासंबंधी आपण काही करायले हवे ही भावना रुजली होती. नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. बारावी झाली, नागपूरला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शिक्षण घेत असताना निर्माण संस्थेकडून ग्रामीण भागात काम कराल का, असे विचारणे झाले. तत्काळ होकार दिला. गडचिरोली जिल्ह्यात यानिमित्ताने काम करता आले. वरिष्ठ डॉक्टर्स, समाजसेवक आणि स्वयंसेवक यांच्यासोबत काम करताना नवनवीन बाबी अभ्यासता आल्या, अनुभवता आल्या. निरीक्षणातून जाणवले की ग्रामीण तसेच दुर्गम ठिकाणी वैद्यकीय सोयीअभावी महिलांची अवस्था अतिशय कठीण आहे. डॉक्टर किंवा संबंधित कर्मचारी पुरुष असल्यामुळे महिलांची कुचंबणा होते. शरीराला झालेले रोग, आजार आणि व्याधी याबाबतीत त्या मुक्तपणे व्यक्त होऊ शकत नाही. हे जाणून यादृष्टीने महिलांमध्ये आरोग्याप्रति जागृती करण्याचे ध्येय ठरविले. त्यानुसार कॅम्प, विविध कार्यक्रम आणि प्रत्यक्ष भेटीतून महिलांना प्रोत्साहन देत आहे. वर्षानुवर्षे कवटाळून बसलेल्या आजारांबाबत त्या महिला मोकळेपणाने बोलत होत्या. वैद्यकीय व्यवसायाला आपण या सामाजिक भावनेतून न्याय देऊ शकतो ही भावना यामुळे दृढ झाल्याचे डॉ. हर्षा म्हणाल्या.
स्त्री ही एक अनामिक भीती किंवा दडपणामुळे अबोल राहते. स्वतःच्या शरीराला होणाऱ्या यातना, व्याधी, रोग यांचा उच्चारही त्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे मोकळेपणाने करू शकत नाही. यासंदर्भात त्यांना वैद्यकीय मदत आणि विश्वासाचे बळ देऊन त्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
-डॉ. हर्षा नन्नावरे |
|