वावर आहे तर पॉवर आहे : तीन भाऊ, तीन एकर अन् लाखोंची उलाढाल

वावर आहे तर पॉवर आहे : तीन भाऊ, तीन एकर अन् लाखोंची उलाढाल
Updated on

नागपूर : स्टार्टअप म्हटलं तर डोळ्यांपुढे विशिष्ट चित्र उभे राहते. एखादा पारंपरिक व्यवसाय, कलात्मक वस्तूंची निर्मिती, विक्री किंवा मार्केटिंगचे एखादे मॉडेल, फार फार तर एखादं-दुसरा निराळा उद्योग स्टार्टअपच्या चौकटीत बसतो, असे सर्वसामान्य मत. यात चुकीचे काहीच नाही. खरं तर शेती हे देखील उद्योग आहे. मात्र, अलीकडच्या काळात आपण ते विसरलो. म्हणूनच नवी पिढी या उद्योगापासून चार हात लांब राहणेच पसंत करते. मात्र, या स्टार्टअप कहाणीत थोडा ट्विस्ट आहे. या कहाणीच्या नायकांनी चक्क शेती व्यवसायात स्टार्टअप सुरू केला. होय, हे खरं आहे. भंडारा जिल्ह्यातील पालांदूरच्या नंदनवार बंधूंनी स्टार्टअप सुरू केला, तोही चक्क वावरात. अवघ्या तीन वर्षांच्या शेती व्यवसायात स्वप्निल, आशिष व अंकुश या तिघांनी ‘वावर आहे तर पॉवर आहे’ हे सिद्ध करून दाखवलं... (Startup-Farmers-business-Progress-from-agriculture-nad86)

स्वप्निल बी.ए. बीएड., आशिष एम.ए. बीएड तर अंकुश मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तिघांनीही नोकरीसाठी धडपड न करता शेतीतूनच समृद्धी साधण्याचे ठरवले. त्यानुसार स्वप्निलच्या पुढाकारातून भाजीपाल्याची शेती सुरू झाली. पुढे आशिषने देखील स्वप्निलची मदत सुरू केली. सुरुवातीला दीड एकर जागेवर विविध पारंपरिक पिकांची लागवड केली. यापैकी काकडीच्या पिकाने बऱ्यापैकी कमाई करून दिली. त्यामुळे दोघांनीही भाजीपाल्याची शेती अधिक तंत्रशुद्ध करण्याचे ठरवले. यात त्यांना टप्प्याटप्प्याने चांगले अनुभव येत गेले.

वावर आहे तर पॉवर आहे : तीन भाऊ, तीन एकर अन् लाखोंची उलाढाल
बाजारात दाखल झाले ‘कोरोनाफळ’; मिळतोय ७० रुपये पाव दराने

दरम्यानच्या काळात अंकुश नागपुरात मेकॅनिकल इंजिनिअरिंग करीत होता. त्याच्या मदतीने रिलायन्स फ्रेशशी संपर्क करून त्यांनाही भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात आला. आता हे तिघेही भाऊ सामूहिकरीत्या शेतात मेहनत घेतात. पारंपरिक पद्धतीला फाटा देत त्यांनी नव्या दमाने आणि जोमाने शेती सुरू केली आहे. सर्वसाधारण भाजीपाल्याची पिके घेतानाच त्यांनी ब्रोकोली (हिरव्या रंगाची फुलकोबी) व फ्रेंच बिन्स सारख्या विदेशी भाज्यांचे उत्पादनही घेतले. सोबतच त्यांनी शेतात लाल पत्ताकोबीसुद्धा पिकवून दाखवली. यासाठी त्यांनी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला.

अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन, स्वतःचे अनुभव व मेहनत याची सांगड घालत शंभर टक्केरिस्क असणारा हा व्यवसाय पुढे नेत आहेत. सध्या कारला पिकावर क्रॉप कव्हरचा प्रयोग करून लागत खर्च कमी करण्याचा त्यांचा प्रयोग सुरू आहे. विशेष म्हणजे, आशिषला मार्केटिंगचे कौशल्य असल्याने तो भाजीपाला कुठे आणि कसा विकायचा याचे नियोजन बघतो. तर स्वप्निल व अंकुश शेतातील कामांचे नियोजन करतात. अर्थात या व्यवसायाशी संबंधित सर्व छोटे-मोठे निर्णय तिघेही मिळून घेतात. यामुळेच अवघ्या तीन वर्षांच्या काळात नंदनवार बंधूंनी शेतीतून देखील एक चांगला स्टार्टअप होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.

तब्बल साडेनऊ लाखांचा नफा

मागणी व पुरवठ्याचा ताळमेळ, बाजाराचे नियोजन व विक्री कौशल्याच्या जोरावर कोरोना काळात त्यांनी तब्बल साडेनऊ लाखांचा नफा कमावण्याची किमया केली. त्यामुळे नंदनवार बंधूंनी पारंपरिक शेती करणाऱ्या आणि शेती परवडत नाही, अशी ओरड करणाऱ्या शेतकऱ्यांना जणू वस्तुपाठ घालून दिला आहे. भविष्यात हे काम आणखी उंचीवर घेऊन जायचे आहे, असे सांगताना तिन्ही भावांच्या चेहऱ्यावर आलेली चमक खूप काही सांगून गेली.

वावर आहे तर पॉवर आहे : तीन भाऊ, तीन एकर अन् लाखोंची उलाढाल
आता मेकअपविनाही दिसेल चमकदार चेहरा; करा घरगुती उपायांचा वापर

ग्रामीण भागातही स्टार्टअपचे प्रयोग

लाखनी तालुका जिल्ह्यात मागासलेला असला तरी येथे बऱ्यापैकी शेतीवर प्रयोग करीत असल्याचे स्वप्निल यांनी सांगितले. त्यातून नवनवीन प्रयोग करण्यात येतात. असाच प्रयोग स्वप्निल आणि त्याच्या भावांनी केला. ग्रामीण भागातही स्टार्टअपचे प्रयोग होत आहे. त्यातून व्यवसाय वाढ होत असून युवकांनी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकारच्या व्यवसायाने ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे स्वप्निल आणि त्याचे भाऊ सांगत आहे.

(Startup-Farmers-business-Progress-from-agriculture-nad86)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.