खामगाव : जळगाव (जामोद) येथे गणेश विसर्जन मिरवणूक रस्त्याने जात असताना स्थानिक वायलीवेस परिसरात काही समाजकंटकांकडून मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाल्याने गोंधळ झाला. मात्र, मिरवणुकीवरच्या दगडफेकीची माहिती पोलिस ठाण्यात देण्यास गेलेल्या भा=विकांवरच लाठीहल्ला करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला व मिरवणूक जागेवरच थांबवण्यात आली. तर, शेगाव येथे गुलाल अंगावर उडाल्याने वाद झाला. अकोला जिल्ह्यातील अकोट येथेही मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीत काही भक्त जखमी झालेत. शेगाव व अकोट येथील मिरवणुकी तीन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
जळगाव जामोद येथे रात्रभर मिरवणूक एकाच जागी होती. अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी देवराव गवळी यांचे निलंबन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आज सकाळी मिरवणूक पुन्हा सुरू झाली व मूर्तींचे विसर्जन झाले.