Gadchiroli : गडचिरोलीतील साखेरा गावातल्या चिमुकल्यांना शिक्षणासाठी व्हावे लागते जीवावर उदार

Gadchiroli latest News In Marathi | चिमुकल्यांचे प्राण तळहातावर; दररोज पोटफोडी नदी पार करून जातात शाळेत; मात्र शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी गप्प
students risk lives to reach school
students risk lives to reach schoolSakal
Updated on

- भाविकदार करमनकर

धानोरा : सध्या देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मात्र दळणवळणांच्या सुविधांअभावी मोठ्या व्यक्तीच नव्हे, तर चिमुकल्या विद्यार्थ्यांनाही प्राण तळहाती घ्यावे लागत आहे. तालुक्यातील साखेरा गावातल्या विद्यार्थ्यांना दररोज शिक्षणासाठी येथील पोटफोडी नदी पार करून कारवाफ्याला जावे लागत आहे.

शिक्षणासाठी रोज जीवावर उदार होऊन ही निरागस चिमुकली हा जीवघेणा प्रवास करत असतानाही शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसलेले दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्याचा विकास झाल्याचा डांगोरा लोकप्रतिनिधी व प्रशासन पिटत असते.

पण धानोरा तालुक्यातील कारवाफा‌ येथे शिक्षण घेण्यासाठी साखेरा येथील विद्यार्थ्यांना जीवावर उदार होऊन, जीव धोक्यात घालून नदी ओलांडून जावे लागते. साखेरा गावातल्या मुलामुलींना रोज हे जीवघेणे धाडस करावे लागत असताना जिल्ह्याचा विकास झाला, असे सरकार कसे काय म्हणू शकते, असा प्रश्न पालक व नागरिक विचारत आहेत.

दररोज शाळेत जाण्यासाठी साखेरा येथील विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. साखेरा आणि इतर गावांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पोटफोडी नदीच्या पाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागते. या नदीवर उभारल्या जात असलेल्या नवीन पुलाचे काम अर्धवट आहे.

त्यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून जाताना कपडे भिजण्यासह पाय घसरून प्रवाहात वाहून जाण्याचाही धोका या विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. जेव्हा नदीला पाणी भरपूर असते तेव्हा शिक्षणाला मुकायची पाळी या चिमुकल्यांवर येते.

जास्त पाऊस झाल्यानंतर नदीचा प्रवाह वाढतो. अशा स्थितीत दुथडी भरून वाहणारी नदी ओलांडणे जीवावर बेतू शकते. पण शिक्षणासाठी विद्यार्थी हा धोका पत्करताना दिसत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी स्कूल बससेवा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे.

साखेरा गावातील विद्यार्थ्यांना कारवाफा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, लालमशाह मडावी माध्यमिक विद्यालय व इतर दोन शाळांमध्ये शिकण्यासाठी जावे लागते. साखेरा-कारवाफा दरम्यान वाहणाऱ्या पोटफोडी नदीवर एक छोटा पूल होता.

पावसाळ्यात हा पूल पुराच्या पाण्याखाली येत असे. त्यामुळे चातगाव-पेंढरी मार्गावरील वाहतूक ठप्प होत होती. या समस्येतून परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोटफोडी नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे.

पावसाळा सुरू झाल्याने सध्या या पुलाचे बांधकाम अपूर्ण स्थितीत बंद ठेवण्यात आले आहे. कंत्राटदाराला दिलेली बांधकामाची मुदत भरण्यास आणखी बराच अवधी शिल्लक असल्याचे उपविभागीय अभियंता रवींद्रसिंह चट्टा यांनी सांगितले.

आरोग्यसेवेसाठीही जीव धोक्यात

विशेष म्हणजे साखेरा गावाजवळून वाहत असलेल्या पोटफोडी नदीच्या पलिकडच्या काठावर असलेल्या कारवाफा येथेच प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे. त्यामुळे कोणताही आजार झाला, तर कारवाफाचेच प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागते.

पण पावसाळ्यात नदीच्या अडचणीमुळे ग्रामस्थांना आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ येते. अनेकदा गावात अत्यवस्थ रुग्ण किंवा प्रसूतीची वेळ झालेली, प्रसुती वेदना सुरू झालेली महिला असते.

अशा गंभीर प्रसंगी नदी खळाळून वाहत असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्र गाठणे शक्य होत नाही. आता पावसाळ्याच्या दिवसांत इतर जलजन्य व कीटकजन्य आजारांसोबतच हिवतापाचे रुग्ण वाढतात. पण आरोग्याची समस्या दूर करण्यासाठी जीव धोक्यात घालून नदी पार करण्याशिवाय साखेरावासींना पर्याय नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.